भंडारा: रागाच्या भरात घरून निघून आलेली एक अल्पवयीन मुलगी भंडारा बस्थानकावर बसून होती. ती एकटी असल्याचे पाहून तिला फुस लावून मित्राच्या रूमवर नेत तिच्यावर दोन दिवस सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना भंडारा शहर परिसरात घडली. १५ दिवसांनंतर या अल्पवयीन पीडितेने भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून या प्रकरणी भादंवि कलम ३७६ आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत ५ आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे.
आई वडील काम करण्याकरीता बाहेर जाऊ देत नाहीत तसेच डान्स क्लास लावण्यास नकार देत असल्याचा राग मनात धरून पीडित अल्पवयीन मुलगी आई वडील बाहेर गावी गेले असताना घराबाहेर पडली. २७ जून रोजी ती घरून एकटीच निघून भंडारा बसस्थानकावर आली. बस स्थानकावर एकटी बसून असताना दोन तरुण तिच्याजवळ येऊन विचारपूस करू लागले. हळू हळू त्यांनी तिच्याशी गप्पा मारण्यास सुरवात केली आणि नंतर तिला कोरंभी येथे फिरायला घेऊन गेले. फिरून आल्यावर दोन आरोपींनी पीडितेला त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या घरी नेले आणि तेथे दोन मित्रांना बोलावून घेतले.
हेही वाचा… जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप टाले ‘नॉट रिचेबल’.. पद वाचविण्यासाठी भाजपला शरण?
रात्री उशीर झाल्याने पीडितेने आरोपींना तिला बस स्थानकावर परत सोडून देण्यासाठी आग्रह केला. मात्र त्याचवेळी आरोपींनी तिच्याकडे शारीरीक संबंधांची मागणी केली. पीडितेने नकार दिल्यानंतरही त्यांनी बळजबरीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २८ जून रोजी सकाळी ७ वाजता दोन आरोपींनी तिला बस स्थानकावर परत सोडून दिले. मात्र १० वाजता पुन्हा दोन आरोपी पिडीतेकडे आले आणि तिला जेवण देतो असे सांगून मित्राच्या रूमवर घेऊन गेले. जेवण झाल्यावर दोघांनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर सायकाळी त्यांनी पीडितेला बस स्थानकावर सोडून दिले. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे ती जिल्हा रुग्णालयात थांबून राहिली.
हेही वाचा… वाशीम: अन्याय अत्याचाराविरोधात वंचितचा जन आक्रोश मोर्चा!
गावी जाऊन तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती वडिलांना सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी आरोपी पवन निखार, हितेश निनावे, करण खेताडे, रॉनी कोटांगले, नितेश भोयर ,सर्वाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष सर्व रा. भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले असून पाचही आरोपींच्या अटकेला त्यांनी दुजोरा दिला आहे.