अकोला : अल्पवयीन मुलीला पळवून नेत सतत एक महिना सैलानी येथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलगी गरोदर राहिली होती. या प्रकरणात विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांनी आरोपी युवकास १० वर्षे सक्तमजुरीसह १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
मुलीच्या वडिलांनी १७ जुलै २०१५ रोजी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी गणेश गजानन अंजनकर (३२) रा. कृषीनगर, अकोला याने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. सैलानी येथे एक महिना ठेवत तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याने मुलगी गरोदर राहिली. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीसह पीडिता मुलीला सैलानी येथून ताब्यात घेतले. मुलगी ट्यूशनला जाते, असे सांगून धरून गेली होती. मुलीच्या वडिलांनी आरोपी व त्याच्या कुटुंबावर संशय व्यक्त केला होता. चौकशीदरम्यान पीडितेने तिच्यावर आरोपीने अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
हेही वाचा >>> “तू मला आवडत नाही…” म्हणत हुंड्यासाठी विवाहितेला छळले; अखेर घटस्फोट दिला अन्…
या प्रकरणात सरकारतर्फे एकूण २ साक्षीदार तपासले. आरोपी गणेश गजानन अंजनकर (३२) याला भादंवि कलम २३५, ३७६ (२) (आय) पोक्सो कलम ४, ६ नुसार १० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, कलम ३६३ मध्ये ७ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगाव्या लागणार आहेत. या प्रकरणातील अन्य एक आरोपी दीपक ओंकार नृपनारायण याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील ॲड. किरण खोत यांनी बाजू मांडली.