वाशीम : हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला असून, जिल्ह्यात सहा मार्च रोजी सायंकाळनंतर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथे जवळपास १५० वर्षांपेक्षा अधिक जुने असलेले पिंपळाचे झाड कोसळले. गहू आणि आंब्याच्या पिकांना काही प्रमाणात फटका बसला, तर कुठे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा – अवकाळी मुसळधार; चना गहू कोसळला, आंबेमोहोर गळाला, होळी विझल्या
हेही वाचा – विश्लेषण: नागपूरला होणाऱ्या सी-२० बैठकीचे महत्त्व काय?
जिल्ह्यात ६ मार्च रोजी सायंकाळनंतर अचानक सोसाट्याचा वारा सुटला. रात्री काही ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. तालुक्यातील काही भागांत नुकताच मोहरलेल्या आंब्याचे नुकसान झाले, तर गहू व इतर रब्बी पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. वाशीम तालुक्यातील कोकलगाव येथील जवळपास १५० वर्षांपेक्षा जुने पिंपळाचे झाड कोसळले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, परंतु दुचाकीचे नुकसान झाले. आज (७ मार्च) दुपारपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी वातावरणात गारवा जाणवत होता, तर कुठे हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.