कौटुंबिक वादाला कंटाळलेल्या एका महिलेने आपल्या ११ महिन्यांच्या बाळासह अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका युवकाने बुडणाऱ्या मायलेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला. महिलेला सुखरुप बाहेर काढले, मात्र चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.
शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ३२ वर्षीय महिला ११ महिन्यांच्या बाळाला कडेवर घेऊन अंबाझरी तलावावर आली. काही वेळ ती चिमुकलीसह तलावाच्या पायऱ्यावर बसली. काही क्षणातच तिने चिमुकलीसह पाण्यात उडी घेतली. यादरम्यान काठावर बसलेल्या काही युवकांनी तलावात उडी घेतली. बुडत असलेल्या महिलेला युवकांनी वाचवले. मात्र, चिमुकली पाण्यात दिसत नव्हती. युवकांनी शोधाशोध केल्यानंतर चिमुकली आढळून आली. मात्र, ती बेशुद्ध होती. मायलेकींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेवर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा- चंद्रपूरची दीक्षाभूमी निळ्या पाखरांसाठी सजली, ६६ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ आजपासून
महिलेच्या पतीचा एमआयडीसीत छोटा व्यवसाय आहे. तिला आठ वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कौटुंबिक वादामुळे तणावात होती. त्यामुळे तिने मुलीसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अंबाझरी तलावावर आलेल्या त्या महिलेने मुलीला पाण्यात फेकले आणि त्यानंतर स्वत: पाण्यात उडी घेतली. मुलीचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे तपासाअंती महिलेवर चिमुकलीच्या हत्याकांडाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.