नागपूर : दोन चिमुकल्यांसह पती-पत्नीच्या संसाराचा गाडा व्यवस्थित सुरु असताना पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. काही केल्या पतीच्या मनातील संशय जात नव्हता. घरात वाद वाढत होता. त्यामुळे पत्नीच्या डोक्यात आत्महत्येचा विचार आला. तिने एक चिठ्ठी लिहिली आणि अजनी रेल्वेस्टेशन गाठले. धावत्या रेल्वेसमोर उडी घेण्याच्या तयारीत असतानाच तिच्या डोक्यात दोन्ही मुलांच्या भविष्याचा विचार आला. अशातच देवदुताच्या रुपात पोलीस धडकले आणि त्या महिलेचा जीव वाचवला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
रामटेक येथील रहिवासी रिना (काल्पनिक नाव) एका खासगी रूग्णालयात नोकरी करते. पती एका कंपनीत नोकरीला आहे. त्यांना दोन मुले आहेत. दोघांच्या वयात १८ वर्षांचे अंतर आहे. गुण्यागोविंदाने संसार सुरू असतानाच त्याच्या मनात संशयाने घर केले. वयाने लहान असलेल्या पत्नीचे कुणाशीतरी अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे तिचा घरातील स्वभाव बदलला, असे त्याला वाटत होते. अलिकडे तो तिच्यावर संशय घ्यायला लागला. यावरून नेहमीच त्याच्यात वाद उफाळून येत होता. बुधवारीसुद्धा असाच वाद झाला. रिना घरसोडून निघून गेली. ती नागपुरात आली. अजनी रेल्वेस्थानकावर थांबली. तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. दरम्यान रिना दिसत नसल्याने पतीने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. तो तिची समजूत घालत होता, परंतु तिचा तणाव वाढतच होता.
हेही वाचा – गरिबीचा शाप! अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने पोटच्या पोरीस घरीच पूरले
तिने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली. आत्महत्या करीत असल्याची माहिती पतीला दिली तसेच महिला हेल्पलाईनवरही फोन करून सांगितले. भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे, पोलीस नियंत्रण कक्षाकडून धंतोली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांचा ताफा अजनी स्थानकावर पोहोचला. आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असलेल्या रिनाला ताब्यात घेतले. तिची समजूत काढली. तिला धंतोली ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी तिचे समूपदेशन केले. घटनास्थळ नागपूर लोहमार्ग पोलिसांचा असल्याने तिला लोहमार्ग ठाण्यात आणले. तिचे बयान नोंदविले. पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी पुन्हा समूपदेश करुन पतीच्या डोक्यातील संशयाचे भूत उतरवले आणि पत्नीसह घराकडे रवाना केले.
हेही वाचा – राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता, विदर्भात आज मुसळधार
मुलांची ममता आड आली
एका दिवसालाही ती मुलांपासून वेगळी झाली नाही. प्रत्येक क्षण ती मुलांसाठी जगत होती. मात्र, अचानक तिच्या आयुष्यात वादळ आले. तिच्या मनात विचारांची गर्दी वाढत होती. मुलांच्या आठवणींना ती उजाळा देत होती. आत्महत्येचा विचारांवर मुलांचे प्रेम भारी पडले. एका मागून एक अशा अनेक रेल्वे गाड्या निघाल्यानंतरही आत्महत्या करण्याची तिची हिंमत झाली नाही.