अकोला : हिवाळा सुरू झाला की स्थलांतरीत परदेशी पक्षांच्या आगमनाचे पक्षीमित्रांना वेध लागतात. अकोला जिल्ह्यात यंदा प्रथमच पांढऱ्या शेपटीची टिटवी व ‘टेम्मिंकचा पाणलावा’ पक्ष्यांचे दर्शन झाले, अशी माहिती ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी यांनी दिली. नव्या पाहुण्यांविषयी पक्षीमित्रांमध्ये उत्सुकता लागली आहे.
डिसेंबर महिन्यात स्थलांतरीत देशविदेशातील पक्षी पंचक्रोशीतील पाणवठे, तलाव, धरण परिसरात डेरेदाखल होतात. त्यांच्या अवलोकनासाठी पक्षीमित्रांच्या भेटी सुरू असतात. भल्या पहाटे गुलाबी थंडीत निसर्गदुतांना भेटायला पक्षीमित्रांची लगबग सुरू असते. डिसेंबर महिना निम्मा संपत आला तरी स्थलांतरीत पक्षांनी पाणवठ्यांवर हजेरी लावलेली नाही. अकोला जिल्ह्यात एकूण १५९ प्रजातींचे पक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येतात. यात पाणथळीच्या पक्ष्यांबरोबरच माळरानावरचे, शाखारोही आणि शिकारी पक्षीही असतात. पाणपक्ष्यांमध्ये विविध प्रकारची बदके, पाणथळीत पोटपुजा करणारे पक्षी दाखल होतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौच असे छोटे मोठे पक्षीही येतात. या सर्वांच्या मागावर असलेले दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हरिअर, श्येन, तीसा, कुकरी, खरुची असे शिकारी पक्षीही येतात.
हेही वाचा – गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यात रानटी हत्तींचा मुक्काम, शेतकऱ्यांची चिंता वाढली
हेही वाचा – बुलढाणा : पलसिद्ध महास्वामी पिठात राज्यातील भाविकांची मांदियाळी
डिसेंबरच्या सुरुवातीपासून पक्षीमित्रांची पाहुण्या पक्षांच्या मागावर भटकंती सुरू आहे. द्विजगणांना न्याहाळून कॅमेरात टिपत आहेत. शहरातील पक्षीमित्रांची एक चमू आखातवाडा, कुंभारी, कापशी पाणवठ्यांवर भटकत असताना त्यांना दोन नवे पाहुणे पक्षी प्रथमच अकोल्यात दाखल झाल्याचे आढळले. परिसरात आतापर्यंत दोनच प्रकारच्या टिटव्या आढळत होते. ज्येष्ठ पक्षीमित्र दीपक जोशी, हंसराज मराठे, डॉ.अतुल मुंदडा, देवेंद्र तेलकर यांना कापशी तलाव परिसरात पांढऱ्या शेपटीची टिटवी आणि आखातवाडा तलावावर ‘टेम्मिंकचा पाणलावा’ या दोन नवीन पक्ष्यांचे दर्शन झाले. अकोला जिल्ह्यातील ही पहिलीच नोंद आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद मानवाला मानसिकरित्या सशक्त तर करतोच शिवाय सतत नवे काहीतरी शोधायला प्रवृत्त करतो. पक्षीनिरीक्षणाचा छंद मानवाने जोपासणे आवश्यक असल्याचे मत दीपक जोशी यांनी व्यक्त केले.