लोकसत्ता टीम
अमरावती: नऊ महिन्यापूर्वी प्रेमविवाह केलेल्या एका दाम्पत्याने अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली.
विक्की मंगलदास बारवे (२३) व तुलसी विक्की बारवे (२१) दोघेही रा. चिचखेडा, चिखलदरा, अशी मृतांची नावे आहेत. तुलसी व विक्की यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी विवाह केला, पण कुटुंबातील संघर्षही पाठ सोडत नव्हता. दोन वर्षांपूर्वी विक्कीच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर विक्की हा पत्नी, लहान भाऊ व आईसह राहू लागला.
बुधवारी १७ मे रोजी परतवाडा येथे किराणा आणण्यासाठी जायचे आहे, असे सांगून विक्की हा पत्नी तुलसीसोबत घरून निघाला. परंतु, सायंकाळ झाल्यावरही दोघेही घरी न आल्यामुळे चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी विक्कीच्या मोबाइलवर फोन केला. मात्र, फोन लागत नव्हता. त्यामुळे भांबावलेल्या कुटुंबीयांनी इतरत्र विचारपूस केली. पण, शोध लागला नाही.
दरम्यान, गुरुवारी धरणातील पाण्यात दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. ते मृतदेह विक्की व तुलसी यांचे असल्याचे समोर आले. प्रेमविवाह झालेल्या नवदाम्पत्याने हा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहेत.