वर्धा : सैन्यदलात अग्निवीर म्हणून सेवारत सागर मारोतराव सरोदे यांचे अपघाती निधन झाले. कारंजा घाडगे येथील ते रहिवासी होते. त्यांच्यावर दुपारी अकरा वाजता शासकीय इतमामात कारंजा येथे अंत्यसंस्कार होत आहे. सेवा देत असतांना त्यांच्यासह तीन अग्निवीर असलेल्या वाहनास १९ जानेवारीस अपघात झाला होता. त्यात सागर हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर दिल्ली येथील आर्मीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु झालेत. गत पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचे २५ जानेवारीला निधन झालेत. एक वर्षांपूर्वीच ते भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून रुजू झाले होते. पंजाब राज्यात त्यांची सेवा सुरू झाली. मात्र त्यांची अपघातात प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे.
अग्निवीर म्हणून भरती झाली असल्याने त्यांच्यावर कश्या पद्धतीने अंतिम संस्कार होणार, शासकीय इतमाम मिळणार की नाही, याविषयी चर्चा सुरू झाली. मात्र एक सैनिक म्हणूनच त्यांना सन्मान मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कारंजा येथील तहसीलदार श्रीमती गिरी यांनी यास दुजोरा दिला. आज त्यांचे पार्थिव विमानाने सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी नागपूर विमानतळवर पोहचणार. त्यानंतर सैन्यदलाच्या कामठी येथील छावनीचे अधिकारी ताबा घेऊन मूळ गावी कारंजा येथे पोहचतील. गार्ड तसेच सेरेमोनिअल गार्ड सोबत येणार आहेत. राष्ट्रध्वजात गुंडाळलेले पार्थिव गावी आल्यानंतर तहसीलदार कार्यालय अंत्यसंस्काराची व्यवस्था करणार. त्यांच्यातर्फे पुष्पचक्र वाहण्यात येईल. तसेच पोलीस तुकडी उपस्थित राहणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितले.
हेही वाचा…महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने दोन वर्षांपूर्वी अग्निपथ हा भरती उपक्रम सुरू केला. त्या अंतर्गत अग्निवीर म्हणून चार वर्षासाठी सैनिक भरती सुरू करण्यात आली. साडे सतरा ते एकवीस या वयोगटातील युवक भरतीसाठी पात्र आहेत. त्यांची नियुक्ती संबंधित सेवा कायदा व नियमावलीसह केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तीस ते चाळीस हजार रुपये मासिक वेतन लागू करण्यात आले. या योजनेवर बरीच उलटसुलट चर्चा त्यावेळी झाली होती.