वर्धा : एकाच वेळी अकरा मोर मृत आढळून आल्याने वन विभाग हडबडून गेला आहे. मदनी शिवारात गजानन कुबडे यांच्या शेतात मृत मोर मंगळवारी आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपासणी केल्यावर अज्ञाताने विषप्रयोग केला असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला. शवविच्छेदन करून अग्नी देण्यात आला. तसेच अवयव नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

एक वर्ष वयाचे हे मोर असून अज्ञात व्यक्ती विरोधात वन गुन्हा दाखल करण्यात आला.तर दुसरीकडे आर्वी येथे आठ श्वान विषप्रयोग केल्याने ठार झाले असून नऊ पिल्लांना वाचविण्यात यश आले.रामदेव वॉर्डातील एका व्यक्तीने अन्नात विष कालवून श्र्वानांना खायला दिल्याचे म्हटल्या जात आहे. पर्यावरण बचाव समितीचे शुभम जगताप, गुड्डू ठाकूर, संकेत वणास्कर यांनी विषबाधा झालेल्या पिल्लांना घेवून पशू वैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.डॉ.ठाकरे यांनी उपचार केले.मात्र पाच पिल्लांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अँनिमल रेस्क्यू सेंटर अमरावती येथे हलविण्यात आले. या घटनेने संताप पसरला असून जीव घेणाऱ्या व्यक्तीचा बचाव समितीकडून शोध घेतल्या जात आहे.

Story img Loader