अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चपराशीपुरा भागातून सोमवारी मध्यरात्रीनंतर दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ‘टोल फ्री’ क्रमांकावर पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्याने पोलिसांना आत्महत्या करत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच मोबाईल क्रमांकावर संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला तेव्हा, तुम्ही पोलीस आहात, मला शोधा, असे आव्हान देत त्याने फोन बंद केला.
पोलिसांनी रात्री या व्यक्तीला शोधण्याचा बराच प्रयत्न केला, पण फोन करणारी व्यक्ती आढळून आली नाही. दरम्यान, मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास चपराशीपुरा भागातील महापालिकेच्या रुग्णालयाच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. रामेश्वर मारोतराव सोनोने (४२, रा. खंडाळा ता. नांदगाव खंडेश्वर) असे मृताचे नाव आहे. रामेश्वर सोनोने हे चांदूर रेल्वे मार्गावरील एका वॉटर पार्कमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होते. सोमवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन करुन आत्महत्या करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी संबधित मोबाईल क्रमांकावर पुन्हा कॉल करुन कोण व कुठून बोलत आहे हे विचारले तसेच आत्महत्या करु नका, आम्ही पोहचत आहोत, असे सांगून त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनोने यांनी पोलिसांना ते कुठे आहे, याबाबत माहीती न देताच तुम्ही पोलीस आहात माझा शोध घ्या, असे म्हणून मोबाईल बंद केला.
मंगळवारी सकाळी चपराशीपुरा भागात महापालिकेच्या रुग्णालयाच्या परिसरात एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती एका व्यक्तीने दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. रामेश्वरच्या आत्महत्येचे कारण लगेच कळू शकले नाही. पोलिसांनी मृत रामेशवरजवळ असलेला मोबाईल सुरू केला असता त्यानेच पोलिसांना कॉल केला होता, हे स्पष्ट झाले. त्यावरून त्यांची ओळख पटली, असे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.