अमरावती: पर्यटन कंपनीच्या संकेतस्थळावर रेटींग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची ३२ लाख ८५ हजार ३७४ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे टेलिग्राम, व्हॉटसअॅप वापरकर्त्यांसह १३ वेगवेगळ्या बँक खातेधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका व्यक्तीला मोबाइलमधील टेलिग्राम अॅपवर घरीच राहून काम करण्याची संधी उपलब्ध असल्याबाबत एक संदेश प्राप्त झाला. पर्यटन व्यावसायिक कंपनीच्या संकेतस्थळावर रेटींग दिल्यास घरबसल्या दिवसाला एक हजार ते दीड हजार रुपये मिळतील, असे आमिष या संदेशातून दाखविण्यात आले.
हेही वाचा… सव्वा तास चंद्र पृथ्वीच्या छत्रछायेत, शनिवारी चंद्रग्रहण; जाणून घ्या केव्हा दिसणार..?
तक्रारकर्त्याने होकार दर्शविल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. त्याचवेळी त्यांना एक संकेतस्थळ प्राप्त झाले. तक्रारकर्त्याने आपल्या बँक खात्याची माहिती त्या संकेतस्थळावर भरली. सुरुवातीला कंपनीने दिलेला एक टास्क त्यांनी पूर्ण केला. त्यावेळी त्यांच्या खात्यात काही रक्कम जमा झाली. त्यानंतर कंपनीने त्यांना टूरिस्ट कंपनीसोबत बँक व्यवहार झाल्याचे दाखविण्यासाठी तसेच पर्यटन करू इच्छिणाऱ्यांना विश्वास बसावा म्हणून काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यांनी तो टास्क पूर्ण करून रेटिंग दिल्यावर त्यांच्या खात्यात चांगली रक्कम आली. त्यानंतर सायबर लुटारूंनी त्यांना पैशांचे आमिष दाखवून आणखी टास्क दिले. तसेच त्यांना वेगवेगळ्या १३ बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. अशाप्रकारे तक्रारकर्त्यांची तब्बल ३२ लाख ८५ हजार ३७४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.