नागपूर : आरोग्य चांगले ठेवण्यासाठी घरात पूजा करण्याचा देखावा करून पतीला मंदिरात तर पत्नीला देवघरात पाठवून रोख रकमेसह दागिने पळविले. वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
योगेश्वरनगर, दिघोरी येथील रहिवासी फिर्यादी साधूराम दमाहे (६६) हे घरी असताना भगवा शर्ट घातलेला एक पुरुष आणि भगवा रंगाची साडी घातलेली एक महिला त्यांच्या घरी आले. साधूराम आणि त्यांच्या पत्नीला भेटले. भोंदूबाबाने पती पत्नीचा विश्वास संपादन केल्यानंतर साधूरामने पत्नीच्या आरोग्याबाबत त्यांना सांगितले. पत्नी सतत आजारी असते, काही उपाय सांगा. त्यावर आरोपींनी घरात पूजा घेण्याचा सल्ला दिला. साधूरामने सहमती दर्शविताच आरोपींनी पूजेची तयारी केली. साधूरामला एक नारळ दिले. नारळ जवळच्या मंदिरात फोडायला पाठविले. दरम्यान साधूरामच्या पत्नीला घरातील सोन्याचे दागिने व १० हजार रुपये आणायला सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून तिने दागिने आणि रोख आणून दिले. आरोपींनी संगणमत करून तिला देवघरात पाठविले. ती देवघरात जाताच आरोपी ३० हजार रुपये किंमतीचे दागिने आणि दहा हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल घेवून पसार झाले.
हेही वाचा – नागपूर : पर्यटनाची दिवाळी, गोसेखुर्द जल केंद्राला बुस्ट, प्रसिद्ध अंभोऱ्याचाही विकास
हेही वाचा – नागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा संप? या तारखेपर्यंत दिली वेळ
काही वेळातच साधूराम घरी परतले आणि त्यांची पत्नीसुद्धा देवघरातून आली तेव्हा भोंदूबाबा नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. साधूरामने पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.