नागपूर: तलाठी परीक्षेत घोटाळेबाजांचे रॅकेट अजूनही सक्रियच आहे. आता थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे समोर आले. चिकलठाण्यातील ईऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला आत उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी मंगळवारी सायं. ४.३० वा. अटक केली. दहा लाख रुपयात उत्तरे पुरवल्याची माहिती आहे.
एमआयडीसी सिडकोचे उपनिरीक्षक आत्माराम घुगे पथकासह सोमवारी दुचाकी चोराच्या शोधात होते. या केंद्रासमोर चार तरुण संशयास्पद दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले असता तिघांनी धूम ठोकली. राजू मात्र हाती लागला. राजूच्या खिशात मास्टर कार्ड, दोन मोबाईल मिळाले. त्यातील टेलिग्रामवर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ३४ प्रश्नांचे छायाचित्र होते. राजूने सकाळी ९ वाजताच्या परीक्षेत एका उमेदवाराला उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. सायंकाळीही तो उत्तर पुरवण्याच्या तयारीत होता.
हेही वाचा… वाघाच्या डरकाळ्यांनी गावकरी भयभीत; वनविभाग अलर्ट मोडवर
९ वाजता परीक्षा सुरू होताच अवघ्या १६ व्या मिनिटाला राजूच्या टेलिग्रामवर संपूर्ण प्रश्नपत्रिका आली होती. विजय पाटील नामक आरोपीने त्याला ९.४८ वा. दोन कागदांवर उत्तरे पाठवली. बी. कॉम झालेल्या राजूने फौजदार पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली. मैदानी चाचणीआधी त्याच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल झाला व संधी हुकली. त्यानंतर तो परीक्षा घोटाळ्यात उतरला. दहा लाखांत त्याची टोळी उत्तरे थेट केंद्रात पुरवण्याचा दावा करायची. व्हॉट्सअॅप चॅटिंगमध्ये त्याचा उलगडा झाला. त्याच्यावर असे तीन गुन्हे दाखल आहेत.