पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, वाशीम जिल्ह्यातील कपाशी पिकावर ‘दहिया’ रोगाने आक्रमण केले. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.कपाशी पिकामध्ये दहिया किंवा पानांवरील पांढरे तांबडे डाग या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताना दिसून आला आहे. हा रोग ‘रॅम्युलॅरिया एरिओलाय’ या बुरशीमुळे होतो. मानोरा, कारंजालाड, शेलू, मानोरा, बार्शीटाकळी, मंगरुळपीर, महान, दर्यापूर, म्हैसांग, दहीहांडा, अकोट आदींसह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व परिसरातील प्रक्षेत्रात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाच्या चमूने पाहणी केली.
हेही वाचा >>>वर्धा: आयुर्वेद महाविद्यालयातील पदे भरण्याचा शासनाचा आदेश; ‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. श्यामसुंदर माने यांच्यासह विभागातील प्राध्यापक डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, डॉ. सुनील इंगळे व डॉ. सचिन शिंदे पाटील, डॉ. मिलिंद जोशी यांनी शेतावर भेटी देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी कपाशी रोगाचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून आला. हा रोग अमेरिकन कपाशीवरही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या रोगांची बीजे जमिनीत पडलेल्या रोगट अवशेषामध्ये सुप्तावस्थेत राहतात. पुढील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पोषक हवामानात पुन्हा सक्रिय होऊन कपाशीवर रोगांची लागण होते. रोगांचा दुय्यम प्रसार हवेतून होतो. यावर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाची लागण मोठ्या प्रमाणात दिसून आली. थंड हवेसह जास्त दव खूप दिवस असल्यास बुरशीच्या वाढीस वातावरण अनुकूल असते, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली. या रोगाच्या लक्षणामध्ये सुरुवातीला पानांवर खालील बाजूने अनियमित, टोकदार पांढरट हे पानांच्या शिरांभोवती आढळून येतात. तसेच पानाच्यावरील भागावर सुरुवातीला तांबडे डाग दिसतात. रोगाची तीव्रता जास्त असल्यास पानावर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात. यामुळे या रोगास दहिया हे नाव पडले. पांढन्या रंगाच्या बुरशीचा साधारणतः पानांच्या खालच्या बाजूस अधिक प्रादुर्भाव होतो. रोगाचे प्रमाण अधिक असेल, तर पाने करपून गोळा होऊन वळतात व अकाली गळून पडतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
हेही वाचा >>>अकोला : राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन; साहित्यिकांची मांदियाळी
अशा करा उपाययोजना
या रोगावर कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. प्रादुर्भावग्रस्त पिकाचे अवशेष जाळून नष्ट करावेत, नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळावा तसेच पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असताना फवारणीद्वारे नत्र खते देऊ नये, रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास फवारणी करावी, असा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला.
ओलिताखालील क्षेत्रावर रोगाचे प्रमाण अधिक
हवामानातील जास्त आर्द्रता आणि थंड तापमान दहिया रोगाच्या वाढीसाठी पोषक ठरले. लागवडीतील अंतर कमी असलेल्या पिकामध्ये रोगाचा प्रसार जलद झाला. ओलिताखालील कपाशीमध्ये रोगाचे प्रमाण अधिक दिसून आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.