नागपूर : जलालखेड्याच्या ठाणेदाराने भरधाव कार चालवून एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी कोंढाली रोडवर घडली. शांताराम गोविंद चन्ने (४८, शनिवारपेठ, कोंढाली) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर मनोज चौधरी असे आरोपी कारचालक पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
कोंढाळीत राहणारे शांताराम चन्ने हे संत्री विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते रविवारी दुपारी रवींद्र थावळे आणि विनोद पोकळे या दोन मित्रांसोबत दुचाकीने संत्रा खरेदीसाठी जात असताना कोंढाळी मार्गावर दुधळा गावाजवळ सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांच्या भरधाव कारने शांतारामच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यात विनोद आणि रवींद्र रस्त्याच्या पलीकडे फेकल्या गेले तर शांतारामचा कारखाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात होताच कोंढाली पोलिसांत तक्रार देण्यात आली.
हेही वाचा >>>खरगेंचे खास तरीही काँग्रेस कार्यसमितीतून बाद,नितीन राऊतांबाबत काय घडले ?
हेही वाचा >>>सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वर्धा दौऱ्यात कमालीची गोपनीयता…
मात्र, कोंढाळी पोलीस हे जलालखेड्याचे ठाणेदार मनोज चौधरी यांच्याविरुद्ध तक्रार घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता. शांताराम हे घरी एकमेव कमावते पुरुष असल्यामुळे त्यांची पत्नी, दोन मुलांवर मोठे संकट कोसळले आहे. शांताराम यांच्या कुटुंबियांनी ठाणेदार मनोज चौधरीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. नागरिकांच्या दबावामुळे कोंढाली पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, अटक न केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता.