अकोला : मध्यरात्री एका दुकानात दरोडा टाकणाऱ्या टोळीला पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस पथकाने सिनेस्टाईल रंगेहात पकडण्याची धाडसी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार उमेश यादव व होमगार्ड सैनिक राजेश घाटोळे हे जवाहर नगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका दुकानाचे शटर वाकलेल्या स्थितीत दिसले. ते दुकानाच्या दिशेने जात असताना दुचाकी घेऊन उभे असलेले दोनजण पसार झाले. चोरीचा संशय आल्याने पोलिसांनी दुकानात प्रवेश केला. त्याठिकाणी असलेल्या तिघांनी लोखंडी रॉड व लोखंडी हातोडीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो परतवून लावला. यावेळी परिसरातील शुभम हिवराळे, गणेश नाईक ही मुले पोलिसांच्या मदतीला धावून आले. यावेळी एका आरोपीने मिरची पूड डोळ्यावर फेकण्याचासुद्धा प्रयत्न केला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी शिताफिने पकडले.
हेही वाचा – संतापजनक! घरी खेळायला आलेल्या ५ वर्षाच्या चिमुकलीवर आते भावानेच केला अत्याचार
हेही वाचा – राज्यात विजेची मागणी २८ हजार मेगावॅटवर; कोराडी-चंद्रपूर प्रकल्पात सर्वाधिक वीजनिर्मिती
घटनास्थळावरून एक दुचाकीदेखील जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३९९ नुसार गुन्हा दाखल करून विनायक महेंद्र येन्नेवार (२२, रा. सोपीनाथ नगर), चेतन चंदु निवाने (१८, रा. शिवाजी नगर), गौरव गजानन बोदडे (२६, रा. काटेपुर्णा) यांना अटक करून चौकशी केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाईनचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांच्या नेतृत्वात पोउपनि संदीप बालोद, पोलीस अंमलदार उमेश यादव, होमगार्ड सैनिक राजेश घाटोळे, आशिष खंडारे आदींनी केली.