नागपूर : मेडिकलशी संलग्नित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयातील दगावलेल्या विद्यार्थिनीचा मृत्यू निकृष्ट पाणीपुरी खाल्ल्याने झाल्याचे प्राथमिक निदान वैद्यकीय चाचणीत पुढे आले आहे. त्यामुळे आता शवविच्छेदन अहवालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नर्सिंगच्या इतर दोन विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
नर्सिंग प्रशासनाकडून या प्रकरणाची आणखी माहिती घेतली गेली. त्यात जम्मू काश्मीर येथून मेडिकलमध्ये बी.एस्स्सी. नर्सिंगचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी आलेल्या शीतल राजकुमार (१८) या विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणीने ३ जुलैला मेडिकल चौकात पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर दोघांना गॅस्ट्रोची लागण झाली. शीतलला डॉक्टरांनी दाखल होण्याचा सल्ला दिल्यावरही तिने नकार दिला. परंतु प्रकृती खालावल्यावर तिसऱ्या दिवशी ती रुग्णालयात दाखल झाली. परंतु तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोघींना प्रशासनाने तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले.
हेही वाचा – “घाबरू नका, नव्या दमाने उभ्या राहा”, सोनिया गांधींकडून आमदार प्रतिभा धानोरकरांचे सांत्वन
शुक्रवारी प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुट्टी दिली गेली. या विषयावर मेडिकलच्या काॅन्फ्रन्स सभागृहात एक बैठक झाली. त्यात डॉक्टरांच्या प्राथमिक निदानात या विद्यार्थिनीची प्रकृती निकृष्ट पाणीपुरी खाल्लयाने बिघडल्याचे पुढे आले. या वृत्ताला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनीही दुजोरा दिला.
दोन विद्यार्थिनींचेही पालक नागपुरात
इतर दोन्ही आजारी विद्यार्थिनींच्या पालकांना महाविद्यालय प्रशासनाने सूचना देताच तेही नागपुरात पोहोचले. दोन्ही मुलींना शुक्रवारी सुट्टी झाल्यावर कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला.