नागपूर : दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराजांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) ३० लाख रुपयांचे आव्हान न स्वीकारताच नागपुरातून पळ काढला. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार या भोंदूबाबा व त्यांचे कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करा, अशी मागणी अंनिसचे राष्ट्रीय संघटक व महाराष्ट्र सरकारच्या जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केली.
टिळक पत्रकार भवनात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रा. श्याम मानव यांनी तीन दिवसांपूर्वी पोलिसांना तक्रार दिल्यावरही कारवाई केली नसल्याकडे लक्ष वेधले. प्रा. मानव म्हणाले, २६ वर्षीय धीरेंद्र कृष्ण, बागेश्वर धाम, जिल्हा छत्तरपूर मध्यप्रदेश यांनी रेशीमबागच्या दिव्य दरबारात विविध ‘चमत्कारिक दाव्यासंबंधी’ कार्यक्रम जादूटोणा विरोधी कायदा २०१३ व ‘ड्रग अँड मॅजिक रेमेडिज ॲक्ट’ १९५४ कायद्यानुसार गुन्हा ठरतो. त्यामुळे अंनिसकडून मी ८ जानेवारीला सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित यांना तर १० जानेवारीला पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
हेही वाचा >>> कारागृहातून बाहेर येताच गुंडाने केला खून, उपराजधानीत दर दुसऱ्या दिवशी हत्याकांड
तक्रारीसोबत सगळे यू-ट्युबवरील चलचित्रांचे पुरावेही दिले. तक्रारीनंतर किमान घडू पाहणारा गुन्हा प्रतिबंधित करण्याचा, थांबवण्याचा आणि झालेल्या गुन्ह्याची तक्रार दाखल करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त असलेल्या दक्षता अधिकाऱ्यांकडे (जादूटोणा विरोधी कायद्यासंबंधी) असते. परंतु, अद्यापही गुन्हा दाखल नाही. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भेटून हा प्रकार सांगितला. त्यांना जादूटोणाविरोधी कायद्याची माहिती दिली. तरीही पुढे काहीही झाले नाही.
हेही वाचा >>> लग्नानंतर लगेच उसवताहेत ‘प्रीतीचे धागे’!
दरम्यान, या महाराजांच्या दाव्यावर अंनिसकडून त्यांना दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास ३० लाख रुपये देण्याचे आवाहन देण्यात आले. परंतु, हे आवाहन न स्वीकारताच कार्यक्रम पूर्ण होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच हे महाराज नागपुरातून पसार झाले. त्यामुळे हा महाराज ठगबाज आहे. या महाराजासह कायद्याने त्याच्या कार्यक्रमाचा प्रसार व प्रचारासाठी मदत करणारेही समान दोषी ठरतात.
हेही वाचा >>> नागपूर : मांजामुळे गळे कापल्यानंतरच का जागी होते यंत्रणा?
त्यामुळे या तथाकथित महाराजाला परराज्यातून तातडीने अटक करण्यासह येथील आयोजकांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी अंनिसने केली आहे. पत्रकार परिषदेला हरीश देशमुख, प्रशांत सपाटे, सुरेश झुरमुरे, छाया सावरकर, पंकज वंजारे, सुनील वंजारी, शरद पाटील उपस्थित होते.
हेही वाचा >>> विश्लेषण: ‘अंनिस’ने नागपूरमध्ये आक्षेप घेतलेले धीरेंद्र कृष्ण महाराज आहेत कोण? हा वाद काय?
‘नागरिकांनो, दिव्यशक्तीच्या दाव्यांना फसू नका’
दिव्यशक्ती स्वत:जवळ असल्याचा दावा जाहीररित्या करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराजाने पळ काढला असल्यामुळे ते भोंदू आहेत हे जनतेने ओळखावे व स्वत:ला फसवणुकीपासून वाचवावे. दिव्यशक्तीच्या दाव्यांना फसू नये. या तथाकथित महाराजाची पोलखोल करण्यासाठी गुरुवारी (१९ जानेवारी) रमन सायन्स जवळच्या गुरुदेव सेवा आश्रम येथे जाहीर सभा आयोजित केली आहे. येथे पोलिसांनी आरोपीवर अपेक्षित कारवाईचीही माहिती नागरिकांना दिली जाईल, असेही प्रा. मानव यांनी सांगितले.