Marbat Procession in nagpur नागपूर : ईडा पिडा, रोग राई, जादू टोना, संकटे घेऊन जा गे मारबत…. अशा घोषणा देत भर पावसात नागपुरात ढोल ताशाच्या गजरात सकाळी मारबत बडग्या मिरवणूक निघाली. लोकांमध्ये प्रचंड उत्साह होता. मारबत बघण्यासाठी लाखोंची गर्दी रस्त्यांवर उतरली होती. भ्रष्टाचारावर, नागपूर महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारावर तसेच पेट्रोल डिझेल डीजे सॉंग दोस्तीच्या वाढत्या महागाईवर भाष्य करणाऱ्या बडग्यानी यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी बडग्या उत्सव मंडळातर्फे सनातन धर्मावर टीका करणाऱ्या तामिळनाडूचे मंत्री स्टॅलिन यांचा निषेध करणारा बडगा लोकांचे लक्ष वेधून घेत होता.
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने शहरात काळी पिवळी मारबत आज सकाळी निघाली. १४३ वर्षांची मारबत उत्सवाची परंपरा पुन्हा एकदा नव्या जोशात पाहायला मिळाली. सकाळपासून उत्साहाने पिवळ्या आणि काळ्या मारबतीच्या दर्शनासाठी लोक भर पावसात छत्री रेनकोट घालून घराबाहेर पडले होते. सकाळी १० वाजता जागनाथ बुधवारी परिसरात पिवळ्या मारबतीची पूजा झाली.
हेही वाचा >>>शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…
त्यानंतर काही वेळाने नेहरू चौक परिसरात काळ्या मारबतीची पूजा पार पडली आणि त्यानंतर दोन्ही मारबत आपापल्या मंडपातून बाहेर पडल्या. हजारोंच्या उपस्थितीत दोन्ही मिरवणुका नेहरू पुतळ्याजवळ एकत्रित आल्या. नंतर दोघींच्या एकत्रित मिरवणुकीला सुरुवात झाली. १८८१ पासून १४३ वर्षांची अखंडित परंपरा असलेली ही ऐतिहासिक मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी झाली होती.. यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने पाकिस्तानचा बडग्या तयार करून निषेध केला.