बुलढाणा : जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या घटनेचा आणि निष्क्रिय केंद्र शासनाचा शिवसेना (उबाठा) च्या वतीने येथे निषेध करण्यात आला. मणिपूरसारख्या धगधगत्या राज्याकडे कानाडोळा करणारे केंद्र शासन वाढते दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी यावेळी बोलताना केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज गुरुवारी (दिनांक अठरा) स्थानिय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून घटनेचा जळजळीत निषेध करण्यात आला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख ( घाटावरील) जालिंदर बुधवत आणि बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात आले. जम्मु – काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात कॅप्टन ब्रिजेश थापा, नायक डी राजेश यांच्यासह २ जवान शहीद झाले. या घटनेच्या निषेधार्थ यावेळी निदर्शने करून केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. ‘काश्मीर है हिंदुस्थान का, नाही किसी के बाप का, हिंदुस्थान जिंदाबाद’ , केंद्र सरकारचा निषेध असो निषेध असो’ या घोषणा देत काळे झेंडे दाखवून शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाच्या समारोपात जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्फत केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हेही वाचा – स्थानिक स्तरावर कापूस खरेदी केंद्र सुरू करता येतील का? उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा

मणिपूरकडे दुर्लक्ष, हल्ले रोखण्यात अपयश

बोलतांना लखन गाडेकर यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली. देशातील मणिपूर सारख्या काही राज्यांमध्ये ज्वलंत समस्या निर्माण झाल्या आहे, ती असंतोषाने धगधगत आहे. मात्र, त्याकडे कानाडोळा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद मोदी व गृहमंत्री अमित शहा याना विदेशात जायला वेळ आहे, मात्र त्या राज्यात जायची गरज वाटत नाही. विरोधी पक्ष फोडण्यात व्यस्त केंद्र सरकार दहशतवाद रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे गाडेकर म्हणाले. अलीकडच्या वाढत्या हल्ल्यांनी सिद्ध झाले आहे. जम्मू कश्मीरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा निंदाजनक असून केंद्र सरकारने या संदर्भात वेळीच कठोर पावले उचलणे आवश्यक आहे.

हेही वाचा – अकोला : खळबळजनक! आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले

आंदोलनात उप तालुका प्रमुख विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, संजय गवळी, किसान सेना उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A protest was held here at buldhana on behalf of the shivsena uddhav thackeray faction against the terror attack in jammu and kashmir scm 61 ssb
Show comments