वाशिम: शहरातील रस्त्यावर लाखो रुपये खर्च करून देखील अर्धवट बांधण्यात आले आहेत. एक दोन महिने उलटले तरी रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. एका बाजूचे सिमेंट काँक्रिट पूर्ण झाले. दुसरी बाजू तशीच आहे. रस्त्यावरील चेंबर उघडेच आहेत. पथदिवे बंद असतात. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची वाट तर बघितली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाशिम शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. मात्र शहरात सोई सुविधा हद्दपार झाल्या आहेत. शहरातील सिविल लाईन ते लोणसुने ले आऊट कडे जाणारा रास्ता हे त्याचे उत्तम उदाहरण असे अनेक रस्ते सध्या अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरु आहे. दोन महिन्यापूर्वी या रस्त्याच्या एका बाजूचे सिमेंटीकरण झाले.
हेही वाचा… सावधान! महागडी विदेशी दारू बनावट तर नाही ना…
आता पूर्ण काम होईल असे वाटत होते, मात्र, ठेकेदार कुठे गायब झाले कुणास ठाऊक. अर्धवट काम बंद करुन दोन महिन्यापेक्षा अधिक काळ झाला, मात्र काम सुरु होत नसल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याने स्कूल व्हॅन असो की इतर वाहने यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर भूमिगत गटार चे १० फूट खोल असणारे चेंबर उघडेच आहेत. या भागातील सर्व रहिवासी उच्चविद्याविभूशीत आहेत. तरी सुद्धा नगर पालिकेला जाब विचारणारा कुणीच नसल्याने शहरवासी त्रस्त आहेत.
शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. अनेक रस्ते अर्धवट आहेत. त्यांच्या कामाच्या दर्ज्यावर कुणाचे लक्ष नाही. लाखो रुपयांची रस्ते अल्पावधीतच उखडले जातात. त्यामुळे एरवी विकासाचे श्रेय घेणारे पुढारी रस्त्यांच्या प्रश्नावर मात्र शांत दिसतात.
शहरातील बहुतांश रस्ते नादुरुस्त आहेत. तर काही रस्त्याची कामे वर्ष भरापासून सुरू आहेत. मात्र ही रस्ते अर्धवट असल्याने शाळकरी विद्यार्थी, महिलांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडीने रस्त्याची कामे पूर्ण करावी. – गजानन धामणे