चंद्रपूर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वीज पडून एकही नागरिकाचा जीव जाऊ नये यासाठी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३३ कोटी रुपये खर्चून प्रत्येक ग्रामपंचायतीत एक याप्रमाणे वीजरोधक पोल यंत्र उभारण्यात आले. मात्र, हे वीजरोधक यंत्र कूचकामी ठरले असून गुरुवारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसात वीज कोसळून एकाच दिवशी आठ नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळे वीजरोधक यंत्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात व अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटात वीज पडून निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये यासाठी वडेट्टीवार यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी अधिकारी व संबंधित कंपन्यांच्या बैठका घेतल्या. वीज पडून नागरिकांचा जीव जाऊ नये यासाठी वीजरोधक यंत्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मदत व पुनर्वसन विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील ८२७ ग्रामपंचायतीमध्ये वीज रोधकपोल यंत्र लावण्यासाठी २० कोटी ९२ लक्ष रुपये तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ४५७ ग्रामपंचायतींमध्ये वीजरोधक पोल यंत्रासाठी ११ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
हेही वाचा >>> नागपूर: ती आईसोबत झोपली होती, मध्यरात्री जाग आली अन्…….
दोन्ही जिल्ह्यातील १ हजार ३०२ ग्रामपंचायतीसाठी ३२ कोटी ४८ लक्ष रुपये खर्च करून ग्रामपंचायत परिसरात वीजरोधक यंत्र बसवण्यात आले. मात्र, हे वीजरोधक यंत्र कूचकामी ठरले असून बुधवार व गुरुवारी झालेल्या पावसात वीज कोसळून ९ लोकांना जीव गमवावा लागला आहे. लावण्यात आलेल्या वीजरोधक यंत्रामुळे गावाजवळ अथवा गाव परिसरात वीज कोसळल्याने वीज यंत्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माती परीक्षण न करताच बसवले यंत्र
वीजरोधक यंत्र बसवताना माती परीक्षण केल्यानंतरच बसवणे आवश्यक होते. मात्र, अनेक ग्रामपंचायतींमध्ये वीजरोधक यंत्र बसवताना मातीचे परीक्षण न करताच यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच वीजरोधक यंत्रासाठी ‘अर्थिंग’ प्रणाली किमान दोन ते तीन मीटर देणे आवश्यक होते. मात्र, अनेक ठिकाणी एक मीटरवरच ‘अर्थिंग’ प्रणाली देण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वीजरोधक कूचकामी ठरून नागरिक वीज पडून मृत्युमुखी पडत आहे.