यवतमाळ: गुजरातमधून खत आणून त्याची घरातून अनधिकृत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पुसद येथे पर्दाफाश करण्यात आला. शहरातील शंकरनगरातील एका घरी केलेल्या छापेमारीत १० लाख २४ हजार ३६० रुपये किमतीचा ८३० बॅग खतसाठा आढळून आला. ही कारवाई कृषी विभागाच्या पथकाने केली.
पुसद येथील शंकरनगरातील शंकर सुरोशे याच्या घरी अनधिकृतपणे रासायनिक खतसाठा असून, त्याची शेतकर्यांना विक्री करण्यात येत असून, फसवणूक होत आहे, अशी माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यावरून छापा टाकला. घरात विविध कंपनीच्या खताच्या बॅग मिळून आल्या. त्या बॅगवर खताची किमत ७९० रुपये, एक हजार १५० रुपये , एक हजार २५० रुपये, एक हजार १७५ रुपये , दोन हजार ३५० याप्रमाणे होती.
हेही वाचा… गोंदिया: मानसिक ताण-तणावातून युवकाने स्वत:वरच केला चाकुने वार
८३० बॅग खतसाठा जप्त करण्यात आला. त्याची एकूण किंमत १० लाख २४ हजार ३६० रुपये आहे. विविध कंपनीच्या खताचे नमूने सीलबंद करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यातील काही खत बनावट असल्याचाही संशय कृषी विभागाला आहे. सूचनापत्र देवून राहत्या घरातच खतसाठा सीलबंद करण्यात आला. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी विजय तुकाराम मुकाडे यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शंकर सुरोशे (रा. शंकरनगर) या व्यक्तीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईने पुसद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कार्यवाही जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र मोळोदे, पुसदचे तालुका कृषी अधिकारी विजय विजय मुकाडे, कृषी अधिकारी शंकर राठोउ, अतुलकुमार कदम, पंडीत भिसे, भारत गरड यांनी केली.