गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा शहरात पांढऱ्या रंगाचा दुर्मिळ असा ‘एल्बिनो कोब्रा’ आढळून आला आहे. येथील सर्पमित्र नईम शेख यांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिले. या प्रकारचा कोब्रा आढळून येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असल्याचे शेख यांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात अतिविषारी वर्गातील ‘कोब्रा’ प्रजातीचे साप मोठ्या प्रमाणात आढळतात.
सापाला अल्बीनझम नावाचा त्वचारोग झाल्याने त्याला पूर्णपणे पांढरा रंग प्राप्त होतो. म्हणून त्याला ‘एल्बिनो कोब्रा’ असे नाव पडले आहे. सापांमध्ये हा आजार दुर्मिळ आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा कोब्रा दिसण्याची ही पहिलीच नोंद आहे. यंदा आलेल्या पुरामुळे शहरात साप मोठ्या प्रमाणत आढळून येत आहे. सर्पमित्र नईम शेख यांनी माहिती मिळताच या ‘एल्बिनो कोब्रा’ला पकडून मानवी वस्तीच्या लांब जंगलात सोडून दिले. या सापाची लांबी ५ फुटाच्या जवळपास असल्याचे शेख यांनी सांगितले. पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा नाग बघितल्याने नागरिकांमध्ये देखील या सपाबद्दल कुतूहल पाहायला मिळाले.