गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी गडचिरोली आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावर याला धान्याच्या व्यवहारात अफरातफर केल्याचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले. त्यामुळे पूर्व विदर्भात गेल्या दोन दशकांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या ‘धान्य तस्करी’ची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भात धान्य तस्करीतून हे ‘माफिया’ एक हजार कोटींपेक्षाही अधिकचा घोटाळा करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पूर्व विदर्भ हा प्रामुख्याने धान उत्पादक परिसर म्हणून ओळखल्या जातो. त्यात भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे सर्वात अग्रेसर आहे. दरवर्षी या जिल्ह्यात जवळपास ७० लाख टन तांदळाचे उत्पादन घेण्यात येते. यातले बहुतांश धान शासनाकडून दरवर्षी भरडाईकरिता गिरणीधारकांना कंत्राट देण्यात येते. या प्रक्रियेदरम्यान सुरू झालेला गैरव्यवहार स्वस्त धान्य दुकानापर्यंत कायम राहतो. शेतकऱ्यांकडून धान्य खरेदीसाठी महामंडळाकडून विविध ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहे. अनेकदा या ठिकाणी खरेदीची नोंदणी करतानाच अधिक प्रमाणात दाखविण्यात येतात. पुढे ही भरपाई तेलंगणातील निकृष्ट तांदूळ यात भेसळ करून करण्यात येते.
हेही वाचा – चंद्रपूर : मुलीची अश्लील चित्रफित तयार केल्याने खळबळ, महिलेसह १४ आरोपींना अटक
दरवर्षी याविषयी ओरड होत असते. परंतु एखाद केंद्रावर कारवाई करून मोठा घोटाळा दाबण्यात येतो. यात खरेदी केंद्राच्या कर्मचारीपासून जिल्हा प्रशासनातील अधिकारी, करारपात्र गिरणीधारक ते यांना अभय देणारे राजकीय पुढारी अशी मोठी साखळी या घोटाळ्यात कार्यरत आहे. भंडारा आणि गोंदियातदेखील धान्य गैरव्यवहारप्रकरणी मोठ्या कारवाया झाल्या आहेत. परवाच तब्बल ४० गिरणीधारकांना काळ्या यादीतदेखील टाकले आहे. परंतु पुन्हा वेगवेगळ्या नावाने तेच गिरणीमालक शासकीय कंत्राट मिळवितात. हे चक्र मागील दोन दशकांपासून पूर्व विदर्भात सुरू आहे. यातून अवैधपणे एक हजार कोटींपेक्षाही अधिकची उलाढाल होत असल्याने या परिसरात मोठे ‘माफिया’ तयार झाले आहेत. सोबतच मोठे राजकीय पुढारी सहभागी असल्याने गंभीर प्रकरणातदेखील कारवाई होत नाही.
कोटलावार यांच्यावर निलंबित करताना बरेच गंभीर आरोप लावण्यात आले आहे. त्या आरोपांची योग्य चौकशी झाल्यास अनेकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते. पण प्रशासन उत्सुक नसल्याने काही काळ शांत राहून पुन्हा हे माफिया सक्रिय होतात.
तेलंगणातून सर्रास अवैध पुरवठा
या एकूण धान्य घोटाळ्यात जिल्ह्यातील चांगल्या प्रतीचे धान दळून खुल्या बाजारात वक्री करण्यात येत असते व तेलंगणा छत्तीसगडवरून अवैधरीत्या आणलेला निकृष्ट तांदूळ स्वस्थ धान्य दुकानात वितरित केला जातो. अनेक वर्षांपासून जिल्ह्यात हा गोरखधंदा सुरू आहे. दोन महिन्यांपूर्वी असेच निकृष्ट तांदूळ आढळल्याने केंद्रीय समितीने आरमोरी, वडसातील मिलमालकांवर कारवाईचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. मात्र, कारवाईचे नेमके काय झाले या प्रश्नावर जिल्हा प्रशासन कायम उडवाउडवीची उत्तरे देतात. सोबतच सिरोंचा येथून दररोज तेलंगणातील निकृष्ट तांदूळ महाराष्ट्रात अवैधपणे पुरवठा सुरू असतो. परंतु अद्याप यावर कुणीही कारवाई केलेली नाही.