यवतमाळ : येथील ‘एफडीसीएम’ कार्यालयात कार्यरत कर्मचार्याने दारूच्या नशेत शाळकरी विद्यार्थिनीचा शासकीय वाहनाने पाठलाग करून छेड काढण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी येथील चमेडीया ले-आउट येथे घडली. आकाश विनोद श्रीवास (३१, रा. नेर), असे छेड काढण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कर्मचाऱ्यास चोप दिला. घटना कळल्यानंतर मोठा जमाव यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात धडकला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
हेही वाचा – राज्यातील धर्मादाय रुग्णालयांवर आता विशेष मदत कक्षाची नजर, रुग्णांची हेळसांड थांबणार
हेही वाचा – भाजपा आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर तातडीचे बोलावणे; विषय गुलदस्त्यात
इयत्ता दहावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी ही मैत्रिणीसह शिकवणीवर्गाला जात असताना पांढर्या रंगाच्या शासकीय वाहनाने पाठलाग केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घाईघाईत शिकवणी वर्ग गाठला. ती दुपारी शिकवणी वर्गातून बोहेर आली असता, त्याच वाहनाने पुन्हा पाठलाग सुरू केला. विद्यार्थिनीला मोबाईल क्रमांक मागून हात पकडण्याचा प्रयत्न केला. दोन्ही मुलींना वाहनात बसण्याचा आग्रह धरला. मात्र, घाबरलेल्या मुली धावत धावत नागपूर रोडवर आल्या. त्या ठिकाणी असलेल्या चुलत भावास घडलेली हकीकत सांगितली. त्यावरून वाहन थांबविण्यात आल्याने घटनास्थळी नागरिकांचा जमाव झाला. आकाश याने आपण एफडीसीएम कार्यालयात नोकरीवर असल्याचे सांगितले. यावेळी संतप्त झालेल्या काहींनी त्याला चांगलाच चोप दिला. याप्रकरणी पीडित मुलीने यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.