नागपूर : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकार विविध कार्यक्रम घेत आहेत. त्यात लोकांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत. ‘माझी माती, माझा देश ‘ हा त्यापैकीच एक कार्यक्रम. यात सहभागी होणाऱ्यांना सरकारने ठरवून दिलेल्या ठिकाणी सेल्फी काढायचा आहे. पण हे सेल्फी पॉईंट कुठे ठेवायचे याचे भान नागपुरात महापालिका प्रशासनाने बाळगलेले दिसत नाही.
नागपूर – अमरावती मार्गावरील सर्वाधिक वर्दळीच्या रविवार नगर चौकात सेल्फी पॉईंट लावण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने पहिलेच तो अरुंद झाला आहे. त्यात चारही बाजूंनी येणारी वाहने अशा स्थितीत या चौकात कोणी उभेसुद्धा राहू शकत नाही. थांबून सेल्फी काढणे तर दूरच. अशा स्थितीत तेथे सेल्फी पॉईंट ठेवणे आश्चर्यकारक आहे.