बुलढाणा: लोकार्पण पासून समृद्धी महामार्ग आणि अपघात हे दुर्देवी समीकरण जुळले आहे. यातील बहुतेक अपघात वाहन चालकाला लागणाऱ्या डुलकीमुळे होतात हे दिसून आले आहे.

आज सोमवारी, २८ एप्रिल रोजी उत्तररात्री, हिंदु हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती महामार्गावर झालेला अपघात असाच होता. या अपघातात चालक ठार तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघे अपघातग्रस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जखमीवर दुसरबीड (ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

रात्री अडीच वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, बिडकीन (जि. छत्रपती संभाजीनगर) येथून कांदा घेऊन नागपूरकडे जाणाऱ्या टाटा आयशर वाहन (क्रमांक एमएच २० ईजी ५०१५) च्या चालकाला रस्त्यात डुलकी लागली. यामुळे हे वाहन मीडियम मधील दिशादर्शक आयसी-१२ पोलला भर वेगात धडकले. या अपघातात चालक गणेश गायकवाड (४०, रा. बिडकीन, जि. संभाजी नगर) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा सहकारी मच्छिंद्र क्षीरसागर (रा. पांग्रा, जि. छत्रपती संभाजीनगर) हा गंभीर जखमी झाला आहे.

काही वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प

अपघातानंतर जखमी व्यक्ती व मृत चालकाला सरकारी रुग्णवाहिकेच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय दुसरबीड येथे हलविण्यात आले. अपघातामुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले. पोलीस निरीक्षक शैलेश पवार, पोलीस हवालदार रोशन, पोलीस शिपाई संदीप किरके, भुतेकर यांच्यासह ‘क्युआरव्ही अॅम्बुलन्स टीम’ने तत्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार करीत आहे.