अकोला : कारमध्ये कोंबून नेत गायीची तस्करी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार नाकाबंदीदरम्यान उघडकीस आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आज गणेश स्थापनेच्या पार्श्वभूमीवर अकोला शहर व परिसरात प्रभावीपणे ‘पेट्रोलिंग’ करण्याच्या सूचना दिल्या. पथकाला ‘पेट्रोलिंग’दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून शिवर टी. पॉईंटजवळ नाकाबंदी करण्यात आली. आरोपी मोहम्मद कासीफ मोहम्मद रफीक (२५, रा. खदान अकोला) याच्या ताब्यातील एक पांढऱ्या कारमध्ये (क्र. एम. एच.२४ व्ही १९०१) गायीची वाहतूक करण्यात येत असल्याचे आढळून आले. गायीला अमानुषपणे निर्दयतेने कोंबून नेण्यात येत होते. या गायीला चोरून नेत असल्याचे तपासात उघडकीस आले.
हेही वाचा – Women Reservation : उमा भारतींना काँग्रेसचा पाठिंबा; नेमका मुद्दा काय? जाणून घ्या…
आरोपीकडून २० हजारांची गाय व दोन लाखांची कार असा एकूण दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला बोरगांव मंजु पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.उप.नि. गोपाल जाधव, ए.एस.आय. दशरत बोरकर व त्यांच्या पथकाने केली.