लोकसत्ता टीम
नागपूर : सुमारे ६० टक्के मुलींना वाईट स्पर्शाचा अनुभव येत असून ६७.५ टक्के ज्येष्ठ वयोगटातील महिलांनी विविध वयोगटातील पुरुषांनी नकोसा स्पर्श केल्याची तक्रार नोंदवली आहे. ‘वूई फॉर चेंज’ ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
आणखी वाचा- International Women’s Day ‘८ मार्च’ रोजी साजरा करण्यामागे खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर..
एकविसाव्या शतकात महिला आणि त्यांचे प्रश्न हे पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहेत, महिला आता सबल झाल्या आहेत, असे वारंवार सांगण्यात येते. मात्र, हे चित्र खरे आहे का हे तपासण्यासाठी ‘वूई फॉर चेंज’ने १८ ते २५ आणि २५ ते त्यावरील वयोगटातील महिलांचा अभ्यास केला. यात १८ वर्षे वयापासून तर ६० वर्षे वयोगटातील महिला सहभागी झाल्या. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील महिला या सर्वेक्षणात सहभागी होत्या. याशिवाय मध्यप्रदेश, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, अंदमान अशा विविध राज्यातून तसेच ऑस्ट्रेलिया, स्वीडन येथूनही अनेक महिलांनी त्यांचे मत नोंदवणारे सर्वेक्षण पत्रक भरले. मात्र, हा अभ्यास केवळ महाराष्ट्रातून मिळालेल्या सर्वेक्षणाच्या आधारावरच करण्यात आला. सार्वजनिक स्थळी मुली सर्वात जास्त असुरक्षित असल्याचे यातून स्पष्ट झाले. छेडखानीमुळे अस्वस्थ झाल्याचे प्रमाण विद्यार्थी गटात कमी असले तरी अबोल होण्यासारखी भावनिक स्थिती वाढली आहे. वयाच्या २५ वर्षांच्या आतच काही मुलींनी विविध प्रकारचे अत्याचार अनुभवले आहेत. यातील २५.५ टक्के महिलांच्या आयुष्यावर त्याचा परिणाम झाला आहे. बलात्काराचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. मात्र, अजूनही त्याकरिता कोणत्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो, याची माहिती नव्या पिढीत ५८.७ टक्के व जुन्या पिढीतील ५८.८ टक्के महिलांना नाही. अपमान, बदला घेणे यातून झालेला नकोसा स्पर्श दोन्ही पिढीत अनुक्रमे आठ आणि तीन टक्क्यांनी वाढला आहे. कुणी मागे लागल्यास, अश्लील संदेश पाठवल्यास मुलगी किंवा स्त्री कायद्याचा आधार घेऊ शकते. मात्र ७८ टक्के मुलींना या कलमबाबत माहितीच नाही. कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याबाबतही ६० टक्के महिला अज्ञानी आहेत.
आणखी वाचा- International Women’s Day 2023: ‘हे’ पाच सेफ्टी गॅजेट्स ठरतील उत्तम महिला दिन गिफ्ट, किंमत आहे फक्त…
खरे चित्र समोर
या सर्वेक्षणातून समाजाचे खरे चित्र उभे राहते. या अभ्यासाचा अधिकाधिक उपयोग समाजाला व्हावा, याकरिता ‘वूई फॉर चेंज’ कटिबद्ध असल्याचे ‘वूई फॉर चेंज’च्या समन्वयक प्रा. डॉ. रश्मी पारस्कर सोवनी यांनी सांगितले.