अकोला : सेवाभावी संस्था आणि समाजसेवी नागरिकांनी पुढाकार घेत शहरातील ८३ क्षयरुग्णांना दत्तक घेतले. यांच्याकडून संबंधित क्षयरुग्णांची काळजी घेतली जात असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. महापालिका क्षेत्रांतर्गत ८८४ क्षयरुग्ण आहेत. त्यातील गोरगरीब कुटुंबातील क्षयरुग्णांना दोन वेळचे चांगल्या दर्जाचे जेवण देखील मिळत नसल्याची स्थिती आहे.
क्षयरोग जडलेले अनेकजण शारीरिक परिश्रम करू शकत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवते. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांच्या बँक खात्यात दरमहा केवळ ५०० रुपये जमा केले जातात. ही मदत अत्यंत अल्प असल्याने बहुतांश क्षयरुग्ण आर्थिक अडचणीत सापडतात. क्षयरुग्णांना उपचार कालावधीत सकस आहार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रौढ व्यक्ती, लहान मुलांसाठी दोन वेगवेगळया पर्यायात पोषण आहार निश्चित करून दिला.
हेही वाचा >>> रोहिला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात, टिप्परवर बसलेल्या दोघांचा मृत्यू
संबंधितांना उपचार कालावधीत नियमित स्वरुपात अतिरिक्त आहार देण्यासाठी निक्षय मित्र जोडण्याच्या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. क्षय मुक्तीसाठी समाजाचाही सहभाग वाढविण्याच्या हेतूने नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन अकोला महापालिकेच्यावतीने करण्यात आले. क्षयरुग्णांच्या मदतीसाठी अकोला शहरात ९ सेवाभावी संस्थांनी हात पुढे केला. याशिवाय २८ जणांनी वैयक्तिक स्तरावर क्षयरुग्णांना आवश्यक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
हेही वाचा >>> ‘समृद्धी’वर पुन्हा अपघात! खासगी बस उलटली, २० प्रवासी जखमी
८८४ क्षयरुग्णांपैकी ८३ जणांना निक्षय मित्रानी दत्तक घेतले. त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना आहार पुरविण्यात येत आहे. शहरात निक्षय मित्रांमध्ये भारत विकास परिषद, अर्म ग्रुप, ग्लोबल इको सिस्टम, माहेश्वरी समाज ट्रस्ट, डॉ. पराग माहेश्वरी, डॉ. अर्शद इकबाल, कुष्णापर्ण प्रतिष्ठाण, विप्र वाहिनी गणेश मंडळ, रेल यात्री मजदुर संघ, सुधीर खंडेलवाल, कल्पेश चौधरी, पराग रेनकुंटवार, डॉ.आशिष सालकर, शिवराज बबेरवाल, आकाश मनवर यांचा समावेश आहे.
गरजेच्या तुलनेत निक्षय मित्राची संख्या अगदीच कमी असून समाजातील सर्वच घटकातून यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहरातील स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी निक्षय मित्र योजनेंतर्गत शहरातील क्षय रुग्णांना कोरडे आहार पुरविण्यासाठी दत्तक घेण्याचे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनुप चौधरी यांनी केले.