यवतमाळ : येथील पांढरकवडा मार्गावर गृहरक्षक दलातील जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एका कार वॉशिंग सेंटरमध्ये घडली. अक्षय सतीश कैथवास (३१, रा. भोसा रोड, यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.
अक्षय रात्री कार वॉशिंग सेंटरमध्ये आला होता. यावेळी त्याचा पैशावरून अंजुम नामक युवकासोबत वाद झाला. यातच अज्ञात दोघांनी अक्षयवर हल्ला चढविला.अक्षयने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी त्याला पकडून त्याच्या डोक्यात व कपाळावर गोळ्या झाडल्या. अक्षयवर हल्ला करतानाचे हे थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनास्थळ संवेदनशील भागात असल्याने शहरात काही काळ तणावाचे वतावरण होते. सावकाराची वादातून सुपारी देऊन ही हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>>जगभरातील संत्री संशोधक नागपुरात येणार, काय आहे एशियन सिट्रेस काँग्रेस?
यवतमाळ शहर गेल्या काही वर्षांत क्राईम कॅपिटल म्हणून पुढे येत आहे. अवधूतवाडी पोलीस ठाण्यात अक्षयचे नातेवाईक आक्रोश करत होते. मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा अशी मागणी करून नातेवाईकांनी केली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अपर अधीक्षक पियुष जगताप, एलसीबीचे प्रमुख प्रदीप परदेसी, ठाणेदार मनोज केदारे घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा >>>नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच म्हणतात आंदोलन करा, मी पाठिंबा देतो; काय आहे समस्या, वाचा…
पाच आरोपींना अटक
घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ शहरात सर्वत्र शोधपथक रवाना केले. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. विविध ठिकाणाहून पाच आरोपीना आज रविवारी सकाळी अटक करण्यात आली. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली.