नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना अनोखी भेट दिली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नागपूर ते पचमढी दरम्यान जादा बसफेऱ्या चालवल्या जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पचमढीत महादेवचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.
मध्य प्रदेशातील पचमढी (महादेव) दर्शनासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने नागपुरातील भाविक जात असतात. या काळात पचमढीला यात्राच भरते. या काळात नागपूर- पचमढी दरम्यान प्रवाश्यांची गर्दी बघता खासगी ट्रॅव्हल्स व लहान- मोठे खासगी वाहन धारक अवास्तव प्रवास शुल्क आकारून भाविकांची लुट करतात. त्यामुळे या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) या मार्गावर जास्त बसफेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेस नागपुरातील मध्यवर्ती बसस्थानक असलेल्या गणेशपेठ, घाटरोड, इमामवाडा, वर्धमाननगर या आगारातून सोडल्या जाणार आहे. सोबत पचमढीहून परत येण्यासाठीही जादा बसेसची सोय आहे. त्यामुळे नागपूर- पचमढी दरम्यान यात्रा करतांना सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे.
घाटरोड व गणेशपेठ आगारातून सर्वाधिक फेऱ्या
एसटी महामंडळाने घाटरोड, गणेशपेठ, इमामवाडा, वर्धमान नगर आगारातून पचमढीसाठी बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार एसटी महामंडळाच्या घाटरोड आगारातून १४ फेऱ्यांचे नियोजन असून त्यात दिवसभरात कमी- अधिक वेळात सोडल्या जाील. तर गणेशपेठ आगारातून १४ फेऱ्या, इमामवाडा आगारातून ६ फेऱ्या, वर्धमान नगर येथून ८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या फेऱ्या ११ हजार १७२ किलोमिटरच्या आहे. तर या सर्व फेऱ्यांसाठी महामंडळाकडून तब्बल ४२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
पचमढी बसस्थानकाच्या व्यवस्थापनासाठीही अधिकारी
पचमढी यात्रेदरम्यान नागपुरातील बसेसच्या नियोजनावर गणेशपेठ आगारातील व्यवस्थापकांसह इतरही अधिकाऱ्यांचे लक्ष राहणार आहे. तर पचमढी बसस्थानकावरही एसटी प्रवासादरम्यानच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी एसटी महामंडळाने अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
एसटी महामंडळाकडून तिकीटांच्या आगाऊ आरक्षणाची सोय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) पचमढीला महादेवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या बसमध्ये आगाऊ आरक्षणाचीही सोय केली आहे. हे आरक्षण एसटीच्या आगारांमध्ये करणे शक्य असल्याचे महामंडळाचे म्हणने आहे.
सुरक्षित प्रवासाचा दावा
चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वसामान्य प्रवाशांचे सार्वजनिक प्रवासाचे प्रमुख साधन म्हणून एसटीच्या प्रवासी वाहतुकीकडे बघितले जाते. एसटी महामंडळाकडून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासह वाहनांच्या देख-रेखीवर विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे खासगीच्या तुलनेत एसटीच्या बसेसच्या अपघाताचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याचा महामंडळाचा दावा आहे.