बुलढाणा : अवैध सावकारी करणाऱ्या मोताळा तालुक्यातील महिलेच्या घरी आज, शुक्रवारी सहकार विभागाच्या विशेष पथकाने झडती घेतली. पोलीस संरक्षणात करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तावेज आणि धनादेश जप्त करण्यात आले.
मोताळा तालुक्यातील कुऱ्हा येथील वंदना देवसिंग धोती या महिलेच्या घराची विशेष पथकाने झाडाझडती घेतली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उप निबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या पथकाने झडती घेतली. यावेळी संशयास्पद कोरे धनादेश, कोरे ‘बॉण्ड पेपर’, हिशोबाच्या नोंदी असलेल्या वह्या जप्त करण्यात आले. याची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा >>>“अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजीव गांधींनी प्रयत्न केले, पण…”, नाना पटोलेंची भाजपावर टीका
कारवाईत सहकार विभागाचे अधिकारी गारोळे, आमले, कर्मचारी सुरडकर, शिरसाट, गोंधळेकर, बॉंडे, डहाके, बाबर, घाटे, सोनुने हे सहभागी झाले. मोताळा तहसीलचे जोशी, जाधव हे पंच म्हणून हजर होते. पोलीस भाग्यश्री पवार, धीरज चंदन यांच्या संरक्षणात कारवाई करण्यात आली.