लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणाऱ्या कारचे टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन उलटली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. आज, गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त कार नागपूरवरून शिर्डीकडे जात होती. सिंदखेड राजा इंटरचेंजनजिक व मुंबई कॉरिडॉरजवळ भरधाव कारचा टायर फुटला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात जय धीरू भंडारी (२१, अहमदाबाद, गुजरात), मुकेश मनुभाई पकताना (४०, अमरती, गुजरात) व प्रदीप सानप (कारंजा) हे तिघे जखमी झाले. यापैकी जय भंडारी याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जालना येथे हलवण्यात आले. उर्वरित दोघांवर सिंदखेडराजा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A speeding car overturned after a tire burst on the samruddhi highway buldhana scm 61 dvr