नागपूर : भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन युवक गंभीर जखमी झाले.तिघांनाही एम्स रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना एकाचा रस्त्यातच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिसऱ्या युवकावर उपचार सुरु असून त्याचीही प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. हा विचित्र अपघात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुकळी गावाजवळ झाला. आर्यन हुकुमचंद पालीवाल (२३) आणि सुमित राहुल सिरसाट (१७, महाजनवाडी, हिंगणा) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर अरमान रविंद्र मडामे (१७, महाजनवाडी, गदाम लेआऊट) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.
हिंगणा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी ट्रकचालकाला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन पालीवाल याने मित्र सुमित सिरसाट आणि अरमान मडामे यांच्यासह जेवण कराण्याचे नियोजन केले होते. ठरल्याप्रमाणे बुधवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीनेह तिघेही जेवण करण्यासाठी ढाब्यावर गेले. जेवन केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तिघेही दुचाकीने परत हिंगण्याकडे येत होते. ग्रीन वेलवेट लॉनच्यासमोर सुकळी गुपचूप गावाकडे जाणाऱ्या रोडवरुन जात असताना समोरुन भरधाव ट्रक (जीजे ३७ टी-७९१४) येत होता. भरधाव ट्रकचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने थेट दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत आर्यन पालीवाल आणि सुमित सिरसाट हे दोघेही रस्त्याच्या मधोपध पडले तर तिसरा मित्र आर्यन हा रस्त्याच्या कडेला फेकल्या गेला. रस्त्यावर पडलेल्या आर्यनच्या छातीवरुन ट्रकचे चाक गेले तर सुमितच्याही अंगावरुन चाक गेले. तिघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होते. ट्रकचालकाने रक्ताच्या थारोळ्यात तिघांनाही पडून बघितल्यानंतर घटनास्थळावर ट्रक उभा करुन पळ काढला. काही वेळानंतर मागून येणाऱ्या एका दुचाकीचालकाला तो अपघात दिसला. त्याने हिंगणा पोलीस ठाण्याला फोन केला. हिंगण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीतेंद्र बोबडे हे ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. त्यांनी रुग्णवाहिकेने आर्यन पालीवाल आणि सुमित सिरसाट या दोघांना एम्स रुग्णालयात दाखल केले तर अरमान मडामे याला हिंगण्यातील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आर्यनचा छातीवरुन ट्रकचे चाक गेल्यामुळे त्याचा एम्स रुग्णालयाच्या रस्त्यातच मृत्यू झाला. तर सुमित सिरसाट याच्यावर तातडीने उपचार सुरु होते. त्याचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अरमानवर सध्या उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी हुकुमचंद बलराम पालीवाल यांच्या तक्रारीवरुन ट्रकचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. ट्रकचालक मोइन जुम्माभाई इंगोरा (२५, रा. तरसई गाव, ता. जामजोधपूर जि. जामनगर-गुजरात) याला अटक केली.
हे ही वाचा… वाल्मीक कराड, बीड पोलीस स्टेशन अन् पाच बेड… विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
… तर वाचला असता एकाचा जीव
अपघात होताच ट्रकचालकाने घटनास्थळावर ट्रक सोडून पळ काढला. अपघातानंतर जवळपास अर्धा तास त्या रस्त्यावरुन कुणीही फिरकले नाही. त्यामुळे जखमींना जवळपास तासभर उपचार मिळण्यास उशिर झाला. जर ट्रकचालक मोईन इंगोराने मनात भीती न बाळगता जखमींना लगेच उपचारासाठी मदत केली असती तर सुमित याचा जीव वाचला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली.