यवतमाळ : भरधाव ट्रकने ऑटोला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोमधील माय-लेकी जागीच ठार झाल्या, तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले.
हा अपघात गुरुवारी सायंकाळी वणी – कोरपना मार्गावर आबई फाट्याजवळ घडला. संजीवनी अनंता नागतुरे (३७), अवनी अनंता नागतुरे (६४), रा. कुर्ली अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दर्शना प्रकाश मडावी (४०), प्रकाश रमण मडावी (४५) दोघेही रा. बेलोरा जि. गडचिरोली, अंबादास नामदेव जिरे (५०), संगीता अंबादास जिरे (४५), शिवाणी सुधाकर जिरे (१४), सर्व रा.बुरांडा ता. मारेगाव, कामिनी धर्माजी जिमने (६३) रा. आबई व ऑटोचालक सुनील बोेंडे रा. शिंदोला हे जखमी झाले.
ऑटो ( एमच २९, एम ००१३) वणीवरून प्रवासी घेऊन कोरपना मार्गाने जात असताना आबई फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ( एचआर ५८, सी ०४८२) ऑटोला जोरदार धडक दिली. या अपघातात संजीवनी अनंता नागतुरे व अवनी अनंता नागतुरे या मायलेकी जागीच ठार झाल्या. संजीवनी एका कार्यक्रमासाठी लहान मुलीस घेऊन वणी येथे आल्या होत्या. ऑटोमधील जखमी प्रवाशांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भरधाव ट्रक अंगावर येत असल्याचे बघून ऑटो चालकाने ऑटो बाजूला थांबविला होता. मात्र, ट्रकने ऑटोला धडक दिली, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.