चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील सर्वोदय महाविद्यालयासमोर भटक्या श्वानाने सहा वर्षीय मुलीच्या गालाला चावा घेत गालाचा लचका तोडला. यात मुलीचा गाल फाटला गेल्याने ती गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आराध्या आशीष मानकर (रा. गांधी वार्ड, बल्लारपूर) असे जखमी मुलीचे नाव आहे. डॉक्टरांनी चिमुकल्या आराध्यावर १९ टाक्यांची अवघड शस्त्रक्रिया केली आहे.
आराध्या खेळत असताना एका श्वानाने तिच्या गालाचा चावा घेतल्या. ती रडायला लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरड केली असता श्वानाने पळ काढला. आराध्या रक्तबंबाळ झाली. घटनेची माहिती मुलीचे वडील आशीष मानकर यांना देण्यात आली. कुटुंबीयांनी लगेच आराध्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी १९ टाक्यांची शस्त्रक्रिया केली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पिसाळलेला श्वानाचा नगरपालिकेने बंदोबस्त करावा अशी, मागणी नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.