वाशिम: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी (ता. अंबड) येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाज व सर्वधर्मिय समाज बांधवांच्यावतीने वाशिम व मंगरूळपीर शहरात कडकडीत बंद पाळला जात आहे. वाशिम शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून मुखाग्नी देऊन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी संवैधानिकरित्या आंदोलन सुरू असताना, पोलीस प्रशासनाकडून आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. याचे तीव्र पडसाद गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात उमटत आहेत. आज वाशीम व मंगरूळपीर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
हेही वाचा… धक्कादायक! मोबाईलचा स्फोट; नशीब बलवत्तर म्हणून…
अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. बंदमुळे वाशीम व मंगरूळपीर शहरात शुकशुकाट पहायला मिळत आहे. बंददरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.