यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाने गुरुवारी रात्री निवासी डॉक्टरवर चाकू हल्ला केला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी रात्रीपासून कामबंद आंदोलन पुकारले. शुक्रवारी आंदोलनात दीड हजार डॉक्टर रस्त्यावर उतरल्याने रुग्णव्यवस्था कोलमडली होती. याप्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. सूरज ठाकूर (३५) रा. नेर, असे हल्ला करणाऱ्या रुग्णाचे नाव आहे.
हेही वाचा- महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन हळदी-कुंकवाने ! दारासमोरील रांगोळी दुष्टशक्तींना रोखत असल्याचा दावा
वैद्यकीय महाविद्यालयातील वार्ड क्रमांक २५ मध्ये भरती असलेल्या सूरज ठाकरे नामक रुग्णाने डॉ. जाबेस्टीन पॉल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात डॉ. पॉल जखमी झाले. गुरुवारी रात्री कनिष्ठ निवासी डॉक्टर हे नेहमीप्रमाणे रुग्णांच्या तपासणीसाठी राऊंड घेत होते. रुग्ण सूरज ठाकरे याची तपासणी करण्यात आल्यावर अचानक त्याने कनिष्ठ निवासी डॉ. पॉल यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. मारेकऱ्याला पकडण्याच्या प्रयत्नात एक डॉक्टरही जखमी झाले. यामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांनी महाविद्यालयाबाहेर येत कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनविरोधात घोषणाबाजी करीत अधिष्ठाता हटावची मागणी रेटून धरली.
हेही वाचा- महिलांच्या जबाबदारीचे विभाजन व्हावे – डॉ. द्रिती बॅनर्जी
जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी तत्काळ वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यानंतर काही काळ तणाव निवळला. मात्र, शुक्रवारी पुन्हा मार्ड संघटनेच्या नेतृत्वात निवासी डॉक्टर, इंटर्न डॉक्टर, एबीबीएसचे विद्यार्थी, बीपीएमटीचे अशा एकूण दीड हजार डॉक्टरांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही. अशी भूमिका प्रशासनापुढे मांडली. निवासी डॉक्टरांसह इंटर्न डॉक्टरांच्या आंदोलनामुळे वैद्यकीय महाविद्यालयाची आरोग्य सेवा कोलमडली. बाह्यरुग्ण विभाग केवळ नावालाच सुरू होते. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरांना रुग्णांची तपासणी करताना तारेवरची कसरत करावी लागली.
हेही वाचा- ‘भारत भविष्यात विज्ञानाची महासत्ता बनेल’; नोबेल विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांचा विश्वास
डॉक्टर व सुरक्षा रक्षकामध्ये वाद
निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन करीत मुख्य प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे कुणालाही आत जाता येत नव्हते आणि बाहेर येता येत नव्हते. दुपारच्या सुमारास एक डॉक्टर बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना सुरक्षा रक्षकाने मुख्य दरवाजा उघडला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या एका डॉक्टरांनी सुरक्षा रक्षकावर हात उगारला. मात्र, अन्य डॉक्टरांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला.