यवतमाळ: ताप आल्याने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलेल्या किन्ही येथील विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान आज, मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. मुलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
चंचल कवडू राठोड (१४, रा. किन्ही), असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मुलीला दोन दिवसांपासून ताप होता. त्यामुळे उपचारासाठी सोमवारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे चंचलने अखेरचा श्वास घेतला. चंचलवर तीन ते चार वर्षांपूर्वी ह्रदयाच्या आजाराची शस्त्रक्रिया झाली होती. जिल्ह्यात सर्वत्र डेंग्यू आजाराची साथ सुरू आहे.
हेही वाचा… वर्धा: आदिवासी आश्रमशाळेत मुलींचा विनयभंग?
किन्ही गावातही डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे हिवताप विभागाच्यावतीने फॉगिंग करण्यात आली होती. कवडू राठोड यांनी मुलीचा मृत्यू डेंग्यू आजाराने झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
हिवताप कार्यालयाकडे नोंद नाही
हिवताप कार्यालयाकडे डेंग्यू आजाराच्या रुग्णांची नोंद करण्यात येते. त्या यादीत चंचल राठोड हिचे नाव नाही. मुलीला हृदयाचा आजार होता. मुलीचा मृत्यू डेंग्यू आजाराने झालेला नाही. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तनवीर शेख यांनी सांगितले.