नागपूर : एकतर्फी प्रेम करणाऱ्या युवकाने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा सतत पाठलाग करुन प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी घातली. तिने नकार देताच अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रूप करुन वडिलांचा खून करण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला हुडकून काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. हा संतापजनक प्रकार बेलतरोडीत उघडकीस आला. नागेश चाफले (२६) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित मुलगी दहाव्या वर्गात शिकते. तिला आई-वडिल आणि एक भाऊ आहे. आर्थिक स्थिती चांगली नसतानाही ती शिक्षण घेत आहे. शिक्षणाची जिद्द असल्यामुळे ती स्वत: मोलमजुरीसाठी जाते. मजुरीच्या पैशातून पुस्तके आणि शाळेच्या तिकिटाचे पैसे जमवते. तिच्या भावाच्याही शिक्षणाची जबाबदारी तिच्यावरच आहे. त्यामुळे ती शाळेला सुटी असल्यानंतर कामावर जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी नागेश हा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. आरोपी नागेश हा महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीवर काम करतो. मुलगी शाळेत जात असताना तो मागील काही महिण्यांपासून तिचा पाठलाग करीत होता. ती मेट्रो रेल्वेने ये-जा करतेे. २२ ऑगस्टला नेहमी प्रमाणे शाळेत गेली. शाळा सुटल्यानंतर पुन्हा मेट्रोने सायंकाळी ४.३० वाजता मैत्रीणीसोबत आली. न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशन मधून बाहेर पडताना आरोपी नागेशने तिला थांबण्याचा इशारा केला. मात्र, तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याने तिच्या मैत्रिणींना धाक दाखवला आणि तेथून निघून जाण्यास सांगितले.   

हेही वाचा >>>अमरावती : खळबळजनक! १५ वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार

अश्लिल चाळे करीत मारहाण

त्याने तिच्याकडे प्रेमसंबंध ठेवण्याचा आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्याने अ‍ॅसिड फेकून चेहरा विद्रूप करण्यासोबतच तुझ्या वडिलांचा खून करील अशी धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी घाबरली व  सुटका करून घेतली. त्याच वेळी आरोपीने तिच्या गालावर थापड मारली आणि शिवीगाळ केली.

आरोपीला काढले हुडकून

भयभीत मुलीने सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. आई सोबत मुलीने बेलतरोडी पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. आरोपीचा ठिकठिकाणी शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासले. लोकेशन मिळविल्यानंतर शनिवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविले. ही कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल  यांच्या नेतृत्वाखालील ठाणेदार मुकूंद कवाडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक स्नेहलता जायभाये, सुहास शिंगने यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A student studying in class 10 was threatened in nagpur adk 83 amy