बुलढाणा : शासकीय वसतिगृहेदेखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. चिखली तालुक्यातील एका शासकीय वसतिगृहात एका १३ वर्षीय विद्यार्थ्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला असून अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.
१३ वर्षीय मुलाचा अधीक्षकाने लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना चिखली तालुक्यातील पेठ येथील वसतिगृहात घडली.
अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केले. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी भारतीय न्यायसंहिता कलम ६८, ११८ (१) व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केली. विनायक (विनोद) देशमुख (५२) असे आरोपी अधीक्षकाचे नाव असून, तो पेठ येथील रहिवासी आहे.
हेही वाचा – ‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
तालुक्यातील पेठ येथे मागासवर्गीय मुलांसाठी शासकीय अनुदान तत्त्वावर वसतिगृह कार्यान्वित आहे. या ठिकाणी जालना जिल्ह्यातील मजूर कुटुंबातील पीडित मुलगा शिक्षण घेण्यासाठी प्रवेशित झाला होता. या मुलासोबत अधीक्षकच अनैसर्गिक कृत्य करत असल्याची बाब उघडकीस आली. पीडित मुलाचा १ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत अधीक्षकाने लैंगिक छळ केला. ही बाब मुलाने आईला सांगितली. कुटुंबीयांनी अमडापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ठाणेदार निखिल निर्मळ यांनी ही घटना गांभीर्याने घेत अधीक्षक देशमुखविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्य दाखल केला. आरोपीने अशा पद्धतीचे आणखी काही विकृत गुन्हे केले काय? या दृष्टीने तपास सुरू आहे.
आरोपी रुग्णालयात दाखल
आरोपीला तातडीने ताब्यात घेण्यात आले. मात्र, तो बीपी, शुगरचा रुग्ण होता. बीपीचा त्रास होऊ लागल्याने त्याला अमडापूरच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथून चिखली येथे भरती करण्यात आले. नंतर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आज सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही वाचा – नागपूर : एचएमपीव्ही संशयित आढळताच सर्वेक्षण, महापालिकेने उचलली ‘ही’ पावले
मुलांना वसतिगृहात ठेवायचे की नाही?
यापूर्वीही खामगावसह जिल्ह्यातील काही वसतिगृहांमध्ये मुला, मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. आता ही घटना समोर आल्याने वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापुढे गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पालकांनी आपल्या पाल्यांना वसतिगृहात ठेवायचे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.