नागपूर : आगामी लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली असून मतदार यादी अचूक करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मतदार यादीत नाव असणाऱ्या ८० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मतदारांची पडताळणी केली जात आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयाकडून नागपूर जिल्ह्यात एकूण १ लाख ६५ मतदारांचे छायाचित्र सारखे असल्याचे कळवण्यात आले आहे. याबाबत तपासणी सुरू असून ते एकाच व्यक्तीचे असेल तर ते वगळण्यात येणार आहे.
दिलेल्या पत्त्यावर मतदार आढळून न आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. एक वर्षानंतर राज्यात प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी महापालिकेच्या निवडणुकाही होणे अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे. मृत, स्थानांतरित, दोन वेळा नावे असणाऱ्या मतदारांची नावे वगळण्यात येत आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध यादीतील ८० वर्षांवरील मतदारांच्या पडताळणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या एकूण १ लाख २७ हजार ४१० मतदारांचे निवडणूक कर्मचाऱ्यांतर्फे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्या मतदारांचे वय मतदार यादीमध्ये चुकीने त्यांचे मूळ वयापेक्षा जास्त टाकण्यात आले आहे अशांच्या वयाची दुरुस्ती केली जाणार आहे.
हेही वाचा – बुलढाणा : भीम जयंती फलकाची विटंबना! खामगाव परिसरात तणाव, शेकडो नागरिक रस्त्यावर
अस्पष्ट छायाचित्र असलेल्यांचे रेकॉर्ड शोधणार
मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र असलेल्या ६६,२८१ मतदारांचे रेकॉर्ड शोधून योग्य छायाचित्र गोळा करून तसेच त्यांच्या नावाच्या नोंदीमध्ये इतर चुका नसल्याची खात्री करून मतदाराकडून नमुना क्र. ८ भरून घेण्यात येत आहे.
हेही वाचा – नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं
“आपले नाव यादीत असल्याबाबत मतदारांनी खात्री करावी. ज्यांची नावे यादीत नसतील त्यांनी नव्याने नोंदणी करावी.” असे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले.