गडचिरोली : आपल्या समृध्द लोकशाहीमुळे एक तडीपार देशाचा गृहमंत्री, तर माझ्यासारखा आदिवासी शिक्षक राज्यात मंत्री बनू शकतो, हीच आपल्या देशातील सुंदरता आहे. ही टिकवायची असेल तर भाजपसारख्या पक्षाला सत्तेतून खाली खेचले पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी केले. जनसंवाद यात्रेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षाकडून सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेनिमित्त नेत्यांची रेलचेल आहे. गुरुवारी माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके यांनी भेट दिली. यावेळी पत्रपरिषदेत ते म्हणाले की, मणिपूरसारख्या घटनांवर पंतप्रधान मोदींसह सर्व सत्ताधारी गप्प आहेत. देशात जातीधर्मात तेढ निर्माण करून दंगली घडविल्या जात आहे. बेरोजगारी, आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण सत्ताधारी यावर बोलण्याऐवजी नावे बदलण्यात व्यस्त आहे. काही बिनडोक लोक वायफळ बोलून समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहे.
हेही वाचा >>> फडणवीसांविरोधातील याचिकेचा निकाल उद्या; न्यायालय जो निर्णय…
संस्थांचा दुरुपयोग करून विरोधकांच्या मागे ‘ईडी’ लावण्यात येत आहे. पत्रकारांना तुरुंगात डांबून लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू आहे. त्यामुळे देशात सत्ताबदल गरजेचे आहे. अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहे असे पुरके म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार नावदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव किरसान, विश्वजीत कोवासे आदी नेते उपस्थित होते.