अनिल कांबळे
नागपूर : किराणा दुकानात माल पोहचविणाऱ्या मालगाडीवरील चालकावर दुकानदाराच्या प्राध्यापक मुलीचे प्रेम जडले. दोघांनी कुटुंबियांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला. मात्र, काही दिवसांतच त्याचे एका भाजी करणाऱ्या महिलेशी सूत जुळले. त्यामुळे प्राध्यापिकेचा संसार अडचणीत आला. भरोसा सेलने पती आणि ४५ वर्षीय भाजीविकेत्या प्रेयसी यांचे समूपदेशन केले आणि प्राध्यापिकेचा नव्याने संसार रुळावर आणला.
नागपुरात किराणा दुकान चालविणाऱ्या दाम्पत्याला सोनाली (बदललेले नाव) नावाची एकुलती मुलगी. तिच्या शिक्षणासाठी वडिलांचा आटोकाट प्रयत्न होता. वडिल काही कामात असल्यास सोनाली अभ्यास करीत दुकानात बसायची. यादरम्यान, दुकानात किराणाचा माल पोहचविणाऱ्या गाडीवरील चालक संजय याची ओळख झाली. उच्चशिक्षित असलेल्या सोनालीचा दहावी नापास संजयशी संपर्क वाढला. यादरम्यान, सोनालीच्या मनात संजयविषयी प्रेम निर्माण झाले.
हेही वाचा >>> स्पर्धा परीक्षेत अपयश; खचलेल्या तरुणीने उचलले टोकाचे पाऊल…
श्रीमंत असलेल्या सोनालीवर संजयचे प्रेम जडले. दोघांच्या भेटी वाढल्या. सोनालीने नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण केली आणि एका महाविद्यालयात नोकरीवर लागली. स्वतःच्या पायावर उभी झालेल्या सोनालीने संजयला लग्नाची मागणी घातली. मात्र, दहावी नापास आणि गाडीचा चालक असलेल्या संजयला सोनालीच्या आईवडिलांनी विरोध केला. सोनालीच्या जिद्दीपुढे आईवडिलांनी त्यांचे लग्न लावून दिले. त्यांना सात वर्षाची मुलगी झाली. व्यवस्थित संसार सुरु होता.
४५ वर्षीय भाजीवालीच्या प्रेमात
प्राध्यापिका असलेल्या सोनालीने पतीला नवीन गाडी आणि घर घेतले. यादरम्यान, संजय हा 45 वर्षीय भाजीविक्री करणाऱ्या शांताबाई नावाच्या महिलेच्या प्रेमात पडला. तिला २० आणि २२ वर्षांच्या दोन मुली. तो दिवसभर तिच्यासोबत भाजी विक्री करीत बसत होता. रात्री शांताबाई त्याला स्वतःच्या घरी नेत होती. दोघेही दारु पिऊन पती-पत्नीप्रमाणे राहात होते. दोघेही तासनतास उद्यानात प्रेमीयुगुलाप्रमाणे बसत होते. शांताबाईने दोन्ही मुलींना संजयची प्रियकर म्हणून ओळख करून दिली होती.
बींग फुटले अन् भरोसा सेल गाठले
शांताबाईच्या दोन्ही मुलींनी संजयच्या पत्नीला गाठले आणि सर्व प्रकार सांगितला. सोनालीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने रात्री घरी आलेल्या संजयला विचारणा केली असता त्याने प्रेमाची कबुली दिली. संसार तुटण्याच्या किनाऱ्यावर असल्याने सोनालीने भरोसा गाठले. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी भाजी विक्रेता शांताबाईचे समूपदेशन केले. तिला लग्नाच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींचा विचार करण्यास सांगितले. तर संजयला प्राध्यापक पत्नी आणि संसाराबाबत समूपदेशन केले. दोघांनीही सामजस्य दाखवल्याने प्राध्यापिकेचा संसार थोडक्यात वाचला.