यवतमाळ : गरीबी आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेल्या अनेक गोष्टी नोकरी लागल्यानंतर पूर्ण करण्याची ‘मनीषा’ सगळे बाळगून असतात. मात्र उमरखेड तालुक्यातील शिवाजीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका ‘मनीषा’च्या नोकरीचा तिसराच दिवस तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कठोर परिश्रम, सततचे प्रयत्न आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर गरिबीवर मात करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे तरुणीला मिळालेल्या नोकरीचा आनंद औटघटकेचा ठरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मनीषा अरविंद घोडके (३४) या शिक्षिकेच्या मृत्यूमुळे नियती किती क्रूर असते याचा प्रत्ययच बुधवारी शिक्षण क्षेत्रासह समाजाने घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिलीच नियुक्ती, त्यात मुलीचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करावा म्हणून शाळेत चॉकलेट घेऊन निघालेल्या मनीषा यांचा साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकला आणि अपघात झाला.

हेही वाचा – जेवणात टाकले विष, पाच चिमुकल्यांसह २८ जणांना बाधा; तीन अत्यवस्थ

दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मनीषा यांचा मृत्यू झाला. मनिषा यांचे माहेर लातूर जिल्ह्यातील उदगीरचे तर नांदेड जिल्ह्यातील मुखेडजवळचे यवत हे त्यांचे सासर. यवत येथील दिगांबर घोडके यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा दुसऱ्या वर्गात तर मुलगी तिसऱ्या वर्गात शिकत आहे. बीए, बीएड करूनही नोकरी न मिळाल्याने दिगांबर यांनी गावातच झेरॉक्सचे दुकान सुरु केले. तेही चालत नसल्याने बंद करुन दिगांबर व मनीषा कामाच्या शोधात किनवटजवळील गोकुंडा गावात आले आणि तेथेच स्थायिक झाले.

दरम्यान मनीषा यांनी शिक्षक भरतीसाठी तयारी सुरू केली. अभियोग्यता परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्यानंतर पवित्र पोर्टलद्वारे त्यांची यवतमाळ जिल्हा परिषदेत निवड झाली. संपूर्ण प्रक्रिया होऊन त्यांना उमरखेड तालुक्यातील कोरटा केंद्रातील शिवाजीनगर -२ या प्राथमिक शाळेत नियुक्ती देण्यात आली होती. नोकरीमुळे गरीबी आणि हलाखीची परिस्थिती दूर होईल म्हणून सर्व कुटुंबीय आनंदात होते. सोमवारी १ जुलै रोजी शाळा सुरु होताच शाळेत हजर झालेल्या मनीषा मुलांमध्ये हरवून गेल्या.

दोन दिवसांत मुलांनाही नवीन शिक्षिका आवडल्या. मात्र बुधवारी शाळेत पोहोचण्याआधीच घात झाला. गोकुंडा येथून १० किमी अंतरावर असलेल्या शिवाजीनगर शाळेत जाण्यासाठी मनीषा पती आणि मुलासह दुचाकीवर निघाल्या. टाकळी ते दराटी या गावादरम्यान असलेल्या पुलावर त्यांच्या साडीचा पदर अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पतीने त्यांना तातडीने अदिलाबाद येथे उपचारासाठी नेले. पण दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच मनीषा यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा – परिक्षेसाठी दोन अल्पवयीन मुली नागपुरात आल्या; ८० वृद्ध घरमालकाने अश्लील चाळे करून…

बुधवारी ३ जुलै रोजी मनीषा यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यामुळे त्या आनंदी होत्या. मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वाटण्यासाठी मनीषा यांनी चॉकलेटसुद्धा सोबत घेतले होते. मात्र चॉकलेट शाळेत पोहोचण्यापूर्वीच मनीषा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिवाजीनगरसह गोकुंडा येथे हळहळ व्यक्त होत आहे. नोकरी लागल्याच्या आनंदात मनीषा यांनी स्वतःचे काही दागिने विक्री करुन गावाकडे घराचे बांधकाम काढले होते. मात्र त्यांचे हे स्वप्नही अधुरे राहिले. यवतमाळ जिल्हा परिषदेत निवड झालेल्या दोनशेपेक्षा अधिक शिक्षकांना यवतमाळ येथे नुकतेच नऊ दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले. त्यातही मनीषा घोडके यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता. नवीन नोकरी आणि विद्यार्थ्यांप्रती त्यांची तळमळ स्पष्ट जाणवत होती, अशी आठवण यवतमाळ ‘डायट’ चे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी सांगितली.

शिक्षकांच्या दातृत्वातून अडीच लाखांची मदत

मनीषा घोडके यांच्या माहेरची आणि सासरचीही परिस्थिती हलाखीची आहे. शिक्षक म्हणून लागलेली नोकरीच या कुटुंबासाठी आधार होती. परंतु, पहिला पगार हातात पडण्यापूर्वी, नोकरीच्या तिसऱ्याच दिवशी मनीषा यांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबे हादरली आहेत. मनीषा यांच्या अपघाती मृत्यूनंतर यवतमाळसह नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी समाज माध्यमांतून सहकाऱ्यांना आवाहन करून अवघ्या एका दिवसात मनीषा यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली. या मदतीतून मनिषा यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याचा मनोदय घोडके कुटुंबीयांनी व्यक्त केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A teacher of shivajinagar zilla parishad primary school in umarkhed taluka died in an accident nrp 78 ssb
First published on: 05-07-2024 at 11:21 IST