नागपूर: एका शिक्षकाने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वॉटर पार्कमध्ये सहलीचे आयोजन केले. परत आल्यानंतर एका विद्यार्थिनीला पार्टी आणि भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने हॉटेलमध्ये बोलावले. तेथे एका रुममध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. भेदरलेल्या अवस्थेत विद्यार्थिनी हॉटेल खाली पळत आली. तिने आरडाओरड केली. घडलेला प्रकार नागरिकांना सांगितला. नागरिकांनी त्या शिक्षकाला येथेच्छ बदडले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम शिक्षकाला अटक केली. गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता यशोधरानगरात घडली. अजयकुमार गंगाराम प्रसाद (३२, रा. छावणी, सदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजयकुमार प्रसाद हा गणित या विषयाचे ट्युशन क्लासेस घेतो. तो विकृत प्रवृत्तीचा असून त्याची नेहमी वर्गातील विद्यार्थिनींवर वाईट नजर असते. पीडित १६ वर्षीय विद्यार्थिनी अकरावीत शिकत असून गेल्या एका वर्षापासून अजयकुमार याच्याकडे शिकते. तिचे वडिल शासकीय सेवेत कार्यरत आहेत. तिला शिक्षकाने अन्य विद्यार्थ्यांसोबत द्वारका वॉटर पार्क येथे सहलीसाठी नेले होते. तेथून परत आल्यानंतर त्याने मुलीला फोन केला आणि पार्टी व भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ममता मॉलजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने रुम बूक केली. मुलीला घेऊन तो हॉटेलमध्ये गेला. तिच्याशी अश्लील चाळे करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि हॉटेलबाहेर पळत आली. तिने आरडाओरड केल्याने काही नागरिक गोळा झाले.

हेही वाचा… नागपूर: तोतया पोलिसांनी मित्रालाच दोन लाखांनी लुटले

नागरिकांनी शिक्षकाला जबर मारहाण केली आणि यशोधरानगर पोलीस ठाण्यात आणले. ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी मुलीच्या आईवडिलांना बोलावून घेतले. आईच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. अजयकुमार प्रसाद याच्या शिकवणी वर्गातील अन्य काही मुलींवर असाच प्रकार केल्याची चर्चा पोलीस ठाण्यात होती. त्यामुळे या शिक्षकाविरुद्ध काही तक्रार असल्यास यशोधरानगर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A teachers attempt to sexually assault a student in nagpur adk 83 dvr