बुलढाणा: निसर्गाच्या तांडवाने हाहाकार उडालेल्या संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक दाखल झाले आहे. हे पथक कातरगाव( ता. संग्रामपूर) येथे अडकलेल्या कुटुंबाच्या बचावाची कार्यवाही करणार आहे. दुसरीकडे एसडीआरएफला पाचारण करण्यात आले असून हे पथक लवकरच दाखल होणार आहे.
मध्यरात्री पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संग्रामपूर व जळगाव तालुक्यातील नदी नाले एक झाले असून अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. कातरगाव ता संग्रामपूर येथे बांधण्यात आलेल्या पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे गावाचा अन्य गावांशी असलेला संपर्क तुटला आहे.गावातील वार्ड क्रमांक २ मधील शंभर एक कुटुंब अडकले आहे. त्यांना सुरक्षित जागी हलविण्याचे काम जिल्हा आपत्ती विभागाचे पथक करणार आहे. यापाठोपाठ धुळे येथून राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक पाचारण करण्यात आले आहे. हे पथक तेथून रवाना झाले असून लवकरच जिल्ह्यात दाखल होणार असल्याचे वरिष्ठ शासकीय सूत्रांनी सांगितले.