नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात २० दिवसांपूर्वी झालेली वाघाची शिकार शिकाऱ्याने नाही, तर संकेतस्थळावर “प्लेबॉय” म्हणून नोंदणी असलेल्या व्यक्तीने केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे या “प्लेबॉय” ने अंधश्रद्धेतून वाघाची शिकार केली आणि त्याला आणखी सहा जणांनी सोबत केली.
१२ जानेवारीला पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वनक्षेत्रात वाघाची शिकार करण्यात आली. या प्रकरणातील सातही आरोपी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्याकडून वाघाची कवटी, नखे, दात जप्त करण्यात आले. आजपर्यंत झालेल्या तपासात आरोपींनी विजेच्या तारांचा करंट लावून वाघाची शिकार केल्याचे व नंतर मृत शरीर कापून पंजे, कवटी, मिश्या, काही हाडे व दात काढले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाघाच्या अवयवाचा वापर अंधश्रध्देच्या कल्पना पूर्ण करण्यासाठी केला असण्याची तसेच इतरांना विक्री केल्याची शक्यता आहे. यातील एका आरोपीचे ऑनलाईन वेबसाईट वरती “प्लेबॉय” म्हणून नोंदणी असल्याने या प्रकरणात अजून काही शक्यता पडताळण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील तपास पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्र संचालक ए. श्रीलक्ष्मी, उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अतुल देवकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे व विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे जवान करत आहेत. कायदेविषयक बाबतीत विधी सल्लागार कविता भोंडगे मार्गदर्शन करत आहे.